भुसावळ (प्रतिनिधी) शाळेच्या पहिल्या दिवशी प्रार्थनेच्या वेळी चक्कर येऊन पडल्याने आठवीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना भुसावळ येथील डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सोमवारी सकाळी घडली. सुयोग भूषण बडगुजर (वय १३, रा. प्रिमिअर हॉटेल मागे, जामनेर रोड भुसावळ) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.
सुयोग सोमवारी पहिल्याच दिवशी उत्साहाने शाळेत आला. आवारात असताना मळमळ होत असल्याचे त्याने सांगितले. प्रार्थना सुरू असतानाच भोवळ येऊन तो जमिनीवर कोसळला. शिक्षक व कर्मचाऱ्यांनी त्याला तात्काळ खासगी दवाखान्यात नेले. डॉ. राजेश मानवतकर यांनी सुयोगची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने व्हेंटीलेटर लावून त्याला आयसीयूमध्ये दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. सुयोगचे वडील महावितरण कंपनीत नोकरीला होते. आठ-नऊ महिन्यांपूर्वीच त्यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्याच्या पश्चात आजी, आई आणि बहीण असा परिवार आहे. दरम्यान, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित करताच कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला.
दोन ते तीन महिन्यांपासून सुयोग हाय टेंन्शन, उच्च रक्तदाबाने त्रस्त होता. जळगाव येथे दोन डॉक्टरांकडे त्याची कलर डॉपलर व विविध चाचण्या केल्या होत्या. यानंतर त्याला पुढील उपचारासाठी गुरुवारी (दि.१५) पुणे येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये नेण्याचे परिवाराने नियोजन केले होते. मात्र, यापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली.