भुसावळ (प्रतिनिधी) स्कॅनवर बॅगची तपासणी करण्यास सांगितल्यानंतर राग आलेल्या परप्रांतीय प्रवाशांना रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना शनिवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास रेल्वे स्थानकावर घडली. याप्रकरणी लोहमार्ग पोलिस ठाण्यात प्रवाशाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करण्यात आली आहे.
शहरातील भुसावळ रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास मुसाफिर खान्यात असलेल्या लगेज स्कॅनरवर आरपीएफ जवान प्रकाश तुर्कले हे कर्तव्यावर हजर होते. त्यावेळी त्यांनी एका प्रवाशाला स्कॅनर मशीनमध्ये त्यांनी बॅगची तपासणी करण्यासाठी टाकण्यास सांगितले. यावेळी प्रवाशासह त्यांच्यामध्ये वाद झाला. संतापाच्या भरात प्रवाशाने अचानक कर्मचाऱ्याला मारहाण सुरू केली. आरपीएफ उपनिरीक्षक एन.के. सिंग यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
पोलिस कर्मचारी भूषण पाटील व उपस्थितांनी संशयित प्रवाशाला लोहमार्ग पोलिस ठाण्यात आणल्यानंतर हवालदार प्रकाश तुर्कले यांनी दिलेल्या फिर्यादवरून संशयित आरोपी प्रवासी राजकुमार प्रसाद (वय ३६, रा.शेंभूपूर, पोलिस स्टेशन चनपटिया, पोस्ट चनपटिया, जि. पश्चिम चंपारण, बिहार) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आरपीएफ प्रकाश तुर्कले यांच्यावर ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचार करण्यात आले.