मुंबई (वृत्तसंस्था) ठाण्यातील शहापूरजवळ सरलांबे येथे समृद्धी महामार्गावरील पुलाचे बांधकाम सुरू असताना गर्डर लॉन्चिंग मशिन पडल्याने १७ मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर तिघे जखमी झाले असून आणखी सहा जण गर्डर मशिनच्या खाली अडकल्याची शक्यता आहे.
समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे काम सरु आहे. रात्रीही समृद्धी महामार्गाचे काम सुरु होते, त्यावेळीच ही दुर्देवी घटना घडली आहे. शाहपूर सरलांबे येथे ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गर्डर मशीनला जोडणारी क्रेन आणि स्लॅब तब्बल शंभर फूट उंचावरुन मजूरांच्या अंगावर कोसळली. यामध्ये 17 मजुरांचा मृत्यू झाला आहे. मृतदेह शाहपूर उप जिल्हा रुग्णालयात आणले आहेत. तीन ते चार जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांना लोकमान्य टिळक पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे. त्याआधीच काही तास ही दुर्देवी घटना घडली आहे. नरेंद्र मोदींनी ट्विट करुन शहापूर दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. शहापूर दुर्घटनेच्या वृत्ताने अतिशय दु:ख झाले असून मृतांच्या कुटुंबीयांबद्दल मी सहवेदना व्यक्त करतो. तसेच, जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना. प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली असून मदत व बचावकार्य सुरू असल्याचेही मोदींनी ट्विटमध्ये म्हटले. तर, मृतांच्या वारसांना पंतप्रधान फंडातून २ लाख तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मंत्री दादा भुसे यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. तसेच, अपघातस्थळी भेट देत पाहणीही केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मध्यरात्रीच घटनेची माहिती घेत संबंधित यंत्रणांना मदतीचे निर्देश आले आहेत. दरम्यान, शाहपूर उपजिल्हा रुग्णालयात सुमारे 15 मृतदेह आणण्यात आले आहेत. तीन ते चार जखमींवर उपचार सुरू आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. अंधारामुळे अजून किती लोक मशीनच्या गर्डरखाली गाडले गेले हे सांगता आले नाही. त्यामुळे मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.