नवी दिल्ली वृत्तसंस्था । कोरोनाविरोधातील लढ्यात मोठा धक्का बसला आहे. कोरोना संकट रोखण्यासाठी सर्वात जास्त अपेक्षा असणाऱ्या ऑक्सफर्डच्या 1222 लसीची तिसरी आणि अंतिम टप्प्यातील चाचणी रोखण्यात आली आहे. ब्रिटनमधील एका व्यक्तीला ऑक्सफर्डची कोरोना लस देण्यात आली होती. मात्र ही व्यक्ती आजारी पडल्यानंतर कोरोना लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी रोखण्यात आल्याचे वृत्त आहे.
ब्रिटनमधील ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि ब्रिटीश-स्वीडिश कंपनीची ही लस संपूर्ण जगासाठी एक आनंदवार्ता देईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. भारतातही या लसीची चाचणी सुरु करण्यात आली होती.ब्रिटनमध्ये तिसऱ्या टप्प्यातील चाचणीवेळी एका व्यक्तीला लस देण्यात आली होती मात्र ही व्यक्ती आजारी पडली असून काही दुष्परिणाम जाणवले. या व्यक्तीला रुग्णालयातही दाखल करावे लागले.
या व्यक्तीला नेमका काय त्रास होत आहे याबद्दल अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही मात्र या प्रकरणाशी संबंधित एका व्यक्तीने प्रकृती लवकर बरी होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. कोरोना लसीच्या चाचणीदरम्यान तिला थांबवणं नवीन गोष्ट नाही,परंतु यामुळे जगभरात लवकरात लवकर कोरोना लस उपलब्ध होण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे.
ब्रिटनच्या आरोग्यमंत्र्यांनी गेल्या आठवड्यात 2021 च्या सुरुवातील लस उपलब्ध होईल अशी आशा व्यक्त केली होती. भारतासहित जगभरातून ही लस मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात ऑर्डर येण्यास सुरुवात झाली होती.ऑक्सफर्डच्या वैज्ञानिकांनी करोना लस फक्त यशस्वी होणार नाही तर सप्टेंबरमध्ये लस उपलब्ध होईल असा विश्वास व्यक्त केला
होता.