कोलकाता वृत्तसंस्था । पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यात जाणुनबुजून यावर्षी दुर्गा पूजा होणार नाही अशी अफवा पसरवली जात असल्याचा आरोप केला आहे. पश्चिम बंगाल सरकारने यावर्षी दुर्गा पूजा होणार नाही असे जाहीर केल्याचे कोणी सिद्ध केले तर मी लोकांसमोर 100 उठाबशा काढेन असे जाहीर आव्हान ममता बॅनर्जी यांनी दिले आहे. पोलीस दिन समारंभ कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
“राजकीय पक्ष दुर्गा पूजेसंबंधी अफवा पसरवत आहे. यासंबंधी अद्याप आपण कोणतीही बैठक घेतलेली नाही. पश्चिम बंगाल सरकारने यावर्षी दुर्गा पूजा होणार नाही असे जाहीर केल्याचे सिद्ध करुन दाखवा, मी लोकांसमोर 100 उठाबशा काढेन,” असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
“काही बनावट आयटी पेजेस दुर्गा पूजेसंबंधी चुकीची माहिती पसरवत आहेत. जाणुनबुजून अफवा पसरवणाऱ्या अशा लोकांना पकडून त्यांना कान पकडून उठाबशा काढायला लावा असे मी पोलिसांना सांगितले आहे. जातीय सलोखा बिघडवण्यासाठीच हे सर्व केले जात आहे. ज्यांनी कधीही दुर्गा किंवा हनुमानाची पूजा केलेली नाही ते लोक पूजेबद्दल बोलत आहेत,” अशी टीका ममता बॅनर्जी यांनी केली आहे. दरम्यान पश्चिम बंगालमध्ये करोनाच्या पार्श्वभूमीवर असलेली बंधनं 20 सप्टेंबरपर्यंत कायम असणार आहेत.