मुंबई प्रतिनिधी । कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं होतं. लॉकडाउनदरम्यान देशातील सर्व उद्योगधंदे, तसंच शाळा, महाविद्यालयंही बंद ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता परंतु आता देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, 21 सप्टेंबरपासून शाळा अंशतः सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यासाठी केंद्राने नवी नियमावली जारी केली आहे.21 सप्टेंबरपासून इयत्ता नववीपासून 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या शाळा अटी शर्थींसह उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. परंतु विद्यार्थ्यांना शाळेत जायचे आहे की नाही, हे ऐच्छिक असणार आहे.
यादरम्यान विद्यार्थ्यांना प्रत्येकामध्ये कमीतकमी 6 फुटांचे अंतर ठेवावे लागणार आहे तसेच मास्कदेखील अनिवार्य असणार आहे. याव्यतिरिक्त कंटेन्मेंट झोनमधील शाळा उघडण्यास मात्र परवानगी देण्यात आली नाही.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तसेच नियमावलीत ऑनलाइन आणि डिस्टन्स लर्निंगही सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. शाळांना जास्तीतजास्त 50 टक्के शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बोलावण्याची परवानगी देण्यात आली आहे.