उत्तर प्रदेश (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशमधील पुढील वर्षी २०२२ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या आधीच काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. युपीए-२ च्या काळात केंद्रात मंत्रीपदी राहिलेले उत्तर प्रदेशमधील वरीष्ठ नेते जितीन प्रसाद यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
प्रसाद म्हणाले की, जर आज खर्या अर्थाने या देशात कोणताही पक्ष असेल तर तो भाजप आहे. राष्ट्रीय पक्ष म्हणून फक्त एकच आणि एकच भाजप आहे. कोणता पक्ष सोडला हे महत्त्वाचे नाही, तर कोणत्या पक्षात प्रवेश केला हे जास्त महत्त्वाचे आहे. भाजपमध्ये प्रवेश करणं हा माझा एक विचारपूर्वक निर्णय आहे.
उत्तर प्रदेश काँग्रेसचं नुकसान
जितीन प्रसाद यांच्या भाजप प्रवेशामुळे कॉंग्रेसला एक झटका आहे. प्रसाद यांच्या प्रवेशाआधीच भाजप राज्यसभेचे खासदार अनिल बलूनी यांनी ट्विटद्वारे काँग्रेसचा मोठा चेहरा पक्षात प्रवेश करणार असल्याचं संकेत दिले होते. भाजपमध्ये येण्यापूर्वी जितीन प्रसाद यांनी गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि रेल्वेमंत्री पियूष गोयल यांची भेट घेतली होती.
कोण आहेत जितिन प्रसाद ?
जितीन प्रसाद हे माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जितेंद्र प्रसाद यांचे पुत्र आहेत. २०१९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. या निवडणुकांनंतर काँग्रेसमध्ये अध्यक्षपदापासून ते पक्षीय कार्यप्रणालीपर्यंत बदल करण्यात यावेत अशी मागणी पक्षातील एका गटाने केली होती. जी-२३ असं या गटाला म्हटलं गेलं. या गटाने आपल्या शिफारशीवजा मागण्यांचं पत्रच सोनिया गांधी यांना सादर केलं होतं. या गटामध्ये जितीन प्रसाद यांचा समावेश होता.