जळगाव (प्रतिनिधी) घरकुल घोटाळ्यात माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या शिक्षेला मिळालेल्या स्थगितीवर आव्हान देणारी याचिका प्रवीण ठाकूर यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्यामुळे जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा प्रचंड खळबळ उडाली आहे.
यासंदर्भात अधिक असे की जळगावसह अवघ्या महाराष्ट्रात गाजलेल्या घरकुल घोटाळा प्रकरणात माजी मंत्री सुरेशदादा जैन, गुलाबराव देवकर यांच्यासह काही आरोपींना दोषी ठरवण्यात आले होते. याबाबत धुळे विशेष न्यायालयाने 31 ऑगस्ट 2019 रोजी शिक्षा ठोठावली होती. धुळे विशेष न्यायालयाच्या या निर्णयाविरुद्ध माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यावर सुनावणी होऊन उच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेस स्थगिती दिली होती. परंतु या स्थगीती आदेशाच्या विरोधात प्रवीण ठाकूर यांनी स्वतंत्र याचिका दाखल करत सर्वोच्च न्यायालयाला विशेष न्यायालयाच्या आदेशावर स्थगिती दिली जावी, अशी मागणी केली होती. या याचिकेवर आता न्यायमूर्ती नागेश्वर राव अजय रस्तोगी यांच्या न्यायालयात सुनावणी होणार आहे. न्यायालयाने राज्य सरकार तथा माजी पालकमंत्री देवकर यांना याबाबत नोटीस बजावली असून आपले म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहे.