मुंबई (वृत्तसंस्था) बॉलिवूडचे शहेनशाह अर्थात ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याकडे २०१५ पासून कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकाची बदली करण्यात आली आहे. हेड कॉन्स्टेबल जितेंद्र शिंदेंची वार्षिक कमाई दीड कोटीच्या घरात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पोलीस आयुक्तांकडून त्यांच्या बदलीचा निर्णय घेण्यात आला आहे.
बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांचे जगभरात लाखो चाहते आहेत. फक्त मोठ्या पडद्यावर नाही तर छोट्या पडद्यावर देखील त्यांनी स्वत:ची छाप सोडली आहे. त्यामुळे अमिताभ जिथे जातील तिथे त्यांची झलक पाहण्यासाठी लोकांची गर्दी होते. या कारणामुळे त्यांना सुरक्षिततेची गरज आहे. अमिताभ यांचे अंगरक्षक म्हणून त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी मुंबई पोलिसातील हेड कॉन्स्टेबल जितेंद्र शिंदे यांची आहे. काल सर्वत्र त्यांच्या वार्षिक पगाराची चर्चा सुरु होती. जितेंद्र यांचा वार्षिक पगार हा दीड कोटी रुपये असल्याचे समोर आल्यानंतर गुरुवारी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी जितेंद्र यांची बदली ही डीबी मार्ग पोलिस ठाण्यात केली.
एका रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन यांचा बॉडीगार्ड जितेंद्र वर्षाला दीड कोटी रुपये कमवतात, अशी माहिती समोर आली होती. जितेंद्र शिंदे गेल्या अनेक वर्षांपासून बिग बींना सुरक्षा पुरवत आहेत. जितेंद्र शिंदे यांची स्वत:ची खाजगी सिक्युरीटी एजन्सी देखील आहे, अशीही माहिती समोर आली होती. हे समोर आल्यानंतर हा प्रकार पोलिस नियमांच्या विरुद्ध आहे. कारण शिंदे हे सध्या खात्यात कार्यरत आहेत. हेड कॉन्स्टेबल या पदावर ते कार्यरत आहेत. ते २०१५ पासून अमिताभ बच्चन यांचे बॉडीगार्ड म्हणून नियुक्त आहेत.
पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर फर्मान काढलं होतं की, चार वर्षांपेक्षा अधिक काळ कुणीही व्यक्ती एका पदावर, एका पोलिस स्टेशनला नसेल. या नियमांतर्गत शिंदे यांची बदली करण्यात आली आहे. आता शिंदे यांना अमिताभ बच्चन यांच्या सेक्युरिटीमधून काढून डी बी मार्ग पोलिस स्टेशनमध्ये बदली करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी देखील करण्यात येणार आहे. हा प्रकार गंभीर असून खरंच शिंदे यांना इतकं वेतन दिलं जात होतं का? याबाबत अमिताभ बच्चन यांच्याकडूनही माहिती घेतली जाणार आहे.