मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना खासदारांचा मोठा गट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होण्याची शक्यता आहे. खासदारांचा दोन तृतीयांश गट शिंदे गटात सहभागी होऊ शकतो. सध्या याबाबत हालचाली सुरू असल्याचे वृत्त समोर आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे.
आमदारांसोबत अनेक नगरसेवकही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करत आहेत. त्यातच आता उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी शिवसेना खासदारांची बैठक पार पडली. यात शिवसेनेचे १५ खासदार उपस्थित होते. ४० आमदारांनंतर शिवसेनेच्या १८ पैकी १५ खासदारांची वर्षा बंगल्यावर ही बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे. झी २४ तास या वृत्तवाहिनीने ही बातमी दिली आहे.
काल रात्री मुख्यमंत्री निवासस्थानी बैठक झाल्याचे समोर आले आहे. आमदारांप्रमाणेच शिंदे गट दोन तृतीयांश खासदारांचा गट तयार करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आमदार, नगरसेवकांनंतर उद्धव ठाकरेंना शिंदे आणखी एक झटका देण्याच्या तयारीत आहेत. शिवसेना खासदारांचा मोठा गट एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्यास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या राजकीय अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं. शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह कुणाला मिळणार याची चर्चा सध्या सुरू आहे. त्यात संसदीय कार्यकारणीचा मोठा गट जर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेला तर संसदीय राजकारणातील अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभा राहिल.