मुंबई (वृत्तसंस्था) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2 हजाराच्या नोटा परत घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी रिझर्व्ह बँकेकडून कालावधी जाहीर करण्यात आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे.
23 मे ते 30 सप्टेंबर नोटा बदला किंवा बँकेत जमा करा !
सर्वसामान्य नागरिक 23 मे ते 30 सप्टेंबर या कालावधीत नोट बदलू शकतात किंवा बँकेत जमा करु शकतात. सर्वसामान्य नागरिक त्यांचं ज्या बँकेत अकाउंट आहे त्या बँकेत जावून नोटा बदलू किंवा जमा करु शकतात.
एकावेळी फक्त २० हजार रुपयेच जमा करता येणार !
२३ मेपासून म्हणजे येत्या मंगळपासून ही नोट नागरिकांना बँकेत जाऊन बदलवता येणार आहे. पण बँकेतील व्यवहार सुरळीत ठेवण्यासाठी सध्यातरी एकावेळी फक्त २० हजार रुपयेच जमा करता येणार आहेत, असं रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलं आहे. २००० रुपयांची नोट बदलवण्याची मुदतही रिझर्व्ह बँकेने दिली आहे. ३० सप्टेंबर २०२३पर्यंत बँकांना २००० रुपयांची नोट जमा करता येईल किंवा बदलवून देता येईल, असं रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलं आहे. मात्र, सध्या बाजारात असलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा व्यवहारासाठी वापरता येणार असल्याची माहिती आरबीआयने दिली आहे. या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत वैध राहणार आहेत. तोपर्यंत ज्यांच्याकडे दोन हजार रुपयांच्या नोटा आहेत, त्यांनी बँकेकडून नोटा बदलून घ्याव्या लागणार आहेत.