जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा पोलिस दलातर्फे प्रथमच जिल्ह्यात एमपीडीए कायद्याअंतर्गत एका महिलेविरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आल्यामुळे गुन्हेगारी वर्तुळातच एकच खळबळ उडाली आहे. रामानंदनगर पोलीस स्टेशन हद्दीतील धनुबाई उर्फ धनु यशवंत नेतलेकर असे स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून तिची अकोला मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
धनुबाई उर्फ धनु यशवंत नेतलेकर या महिलेविरुद्ध दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 65 प्रमाणे एकूण 16 गुन्हे दाखल आहेत. याशिवाय या महिलेविरुध्द तीन वेळा प्रतिबंधात्मक कारवाया देखील करण्यात आल्या आहेत. रामानंदनगर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी याप्रकरणी प्रस्ताव तयार केला होता. पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या निर्देशनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांनी या प्रस्तावाचा पाठपुरावा करत तो प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला होता. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करून पुढील कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार संबंधित महिलेची अकोला मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
रामानंदनगर पो.स्टे. चे पोलीस निरीक्षक, श्रीमती शिल्पा पाटील, पोहेकॉ /संजय सपकाळे, सुशिल चौधरी, राजेश चव्हाण अशांनी स्थानबध्द महिलेस दि. १ सप्टेंबर रोजी ताब्यात घेवून मध्यवर्ती कारागृह, अकोला जि. अकोला येथे दाखल केले. रामानंदनगर पो.स्टे. कडील एमपीडीए प्रस्ताव पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, जळगाव उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आला होता. वरील एमपीडी ए प्रस्ताव हा एम. राज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांच्या पथकातील स.फौ युनूस शेख इब्राहिम, पोहेकॉ सुनिल पंडीत दामोदरे, पोहेकॉ जयंत भानुदास चौधरी, पोका ईश्वर पंडीत पाटील अशांनी काम पाहिले आहे. दरम्यान, जळगाव पोलीस दलाच्या रडारवर आणखी काही हिस्ट्रीशीटर रडारवर असल्याचे कळते.