सांगली (वृत्तसंस्था) भावाविरुद्ध दिलेल्या तक्रार अर्जावरुन गुन्हा दाखल करावा याकरिता पोलीस अधिकाऱ्यास पाच हजार रुपयांची लाच देणाऱ्या एका शेतकऱ्यास लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात ताब्यात घेतले. कडेगाव पोलीस ठाण्याच्या आवारातच मंगळवारी ही कारवाई करण्यात आली. अभिजित नारायण गोरड (वय ३६, रा. उपाळे मायणी) असे कारवाई झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकारची ही जिल्ह्यातील पहिलीच कारवाई आहे.
याबाबत माहिती अशी की, तक्रारदार हे कडेगाव पोलीस ठाण्यातील अधिकारी आहेत. संशयित अभिजित गोरड यांनी त्यांच्या भावाविरोधात कडेगाव पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला होता. या तक्रार अर्जावरून गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याला त्यांनी लाच घेण्याचा आग्रह केला. याबाबत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी सांगलीच्या लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती.
लाच लुचपत विभागाने शुक्रवार दि. ८ रोजी पडताळणी केली असता संशयित अभिजित गोरड यांनी पाच हजारांची लाच घेण्याबाबत अधिकाऱ्यांना आग्रह केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आज मंगळवार दि. १२ रोजी लाच लुचपत विभागाने कडेगाव पोलीस ठाण्याच्या आवारात सापळा लावला. त्यावेळी संशयित अभिजित गोरड यांना पाच हजारांची लाच देताना रंगेहात पकडण्यात आले. सदरची कारवाई लाच लुचपतचे उपअधीक्षक संदीप पाटील, पोलीस निरीक्षक विनायक भिलारे, अंमलदार सलीम मकानदार, चंद्रकांत जाधव, प्रीतम चौगुले, अभिजित पाटील, ऋषिकेश बडणीकर यांच्या पथकाने केली.
















