वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) अमेरिकेत राहणाऱ्या एका भारतीय वंशाच्या डॉक्टरने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्याविरुद्ध अमेरिकेत गुन्हा दाखल केला आहे. भ्रष्टाचार आणि पेगासस हेरगिरीसह अनेक मुद्द्यांवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोलंबियाच्या जिल्हा न्यायालयाने या प्रकरणी तिन्ही नेत्यांसह इतर अनेकांना समन्स बजावले आहेत.
रिचमंड गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट लोकेश व्युरु यांनी नरेंद्र मोदी, वाय.एस. जगन मोहन रेड्डी आणि अदानी यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी कोणत्याही कागदपत्राशिवाय आंध्र प्रदेशातून आलेल्या भारतीय-अमेरिकन डॉक्टरकडून केस दाखल केली गेली आहे. त्याचवेळी न्यूयॉर्कचे वकील रवी बत्रा यांनी या केसला ‘निरर्थक केस’ अशी टीका केली आहे. या प्रकरणात वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे अध्यक्ष प्रोफेसर क्लॉस एम. श्वाब यांचेही नाव असल्याचे सांगण्यात आले आहे.
डॉक्टरांनी आरोप केला की, पीएम मोदी, रेड्डी आणि अदानी यांच्यासह इतर लोक अमेरिकेत मोठ्या प्रमाणात रोख हस्तांतरण करत आहेत. तसेच, राजकीय विरोधकांविरुद्ध पेगासस स्पायवेअरच्या वापरासह भ्रष्टाचारात गुंतल्याचा आरोपही डॉक्टराने केला आहे. 24 मे रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी न्यायालयाने 22 जुलै रोजी समन्स जारी केले होते. भारतात हे समन्स 4 ऑगस्टला पाठवण्यात आले.
या प्रकरणाची माहिती देताना रवी बत्रा यांनी सांगितले की, या प्रकरची केस दाखल करुन लोकेश व्युरुने वेळ वाया घालवला आहे. या प्रकरणात त्यांनी 53 पानांची तक्रारी दाखल करुन फेडरल न्यायालयांचा गैरवापर करत आहेत. यामुळे भारताची बदनामी आणि अपमान करण्यासाठी त्यांनी विदेशी सार्वभौम कायद्याचा गैरवापर केला असल्याची टीका करण्यात आली आहे. ही केस निरर्थकही आहे त्यामुळेच एकही वकील यावर त्यांची बाजू मांडायला तयार नसल्याचेही सांगण्यात आले आहे.