पुणे (वृत्तसंस्था) पुण्याच्या माजी पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. रश्मी शुक्ला यांच्यावर बेकायदेशीर फोन टॅपिंगचे गंभीर आरोप झाले होते. त्यानंतर तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांची समिती स्थापन करण्यात आली. आता या समितीने आपला अहवाल सादर केल्यानंतर रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने अहवाल सादर केला आहे. त्यात रश्मी शुक्ला या दोषी आढळल्या आहेत. त्यामुळे आज पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली आहे. रश्मी शुक्ला यांच्यावर फोन टॅपिंगचा आरोप करण्यात आला होता. या संदर्भात विधानसभेत आवाज उठवण्यात आला होता. त्यानंतर राज्य सरकारने एक समिती स्थापन केली होती. या समितीने शुक्ला यांना या प्रकरणात दोषी ठरवलं आहे. शुक्ला यांनी चुकीच्या पद्धतीने फोन टॅप केल्याचं समितीच्या अहवालात म्हटलं आहे. त्यामुळेच त्यांच्याविरोधात कायदेशीर प्रक्रिया करण्यात आल्याचं सांगण्यात आलं.
फोन कशासाठी टॅप केलें हे लवकरच समोर येईल – दिलीप वळसे-पाटील
काँग्रेस नेते नाना पटोले, संजय काकडे, आशिष देशमुख, बच्चू कडू यांचे फोन टॅप करण्यात आले होते. त्याचा अहवाल आला आहे. मागे त्या चौकशीसाठी आल्या नव्हत्या. ते प्रकरण वेगळं आहे. नवाब मलिक यांच्यावर कारवाई झाली म्हणून ही कारवाई झाली असं बोललं जातं आहे. परंतु असं काही नाही. याबाबतचा अहवाल आला आणि त्यानंतर ही करवाई झाली आहे. सार्वजनिक सुरक्षे अंतर्गत सुरक्षेसाठी फोन टॅप करायची परवनगी दिली जाते. परंतु, या प्रकरणात फोन टॅप करण्याची कोणत्याही प्रकारची गरज नव्हती. त्यामुळें ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांनी फोन कशासाठी टॅप केलें हे लवकरच समोर येईल, असं दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितलं.
नाना पटोलेंचा अमजद खान नावाने झाला होता फोन टॅप
मुंबईत पत्रकारांशी बोलत वळसे पाटील यांनी कुणाचे फोन टॅप केले होते, याची नाव उघड केली आहे. ‘रश्मी शुक्ला पुण्याच्या आयुक्त असताना काही राजकीय लोकांचे फोन टॅप केले होते. रश्मी शुक्ला यांनी योग्य ती प्रक्रिया न फॉलो करता फोन टॅपिंग केलं होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांचा अमजद खान नावाने फोन टॅप करण्यात आल्याचे वळसेंनी सांगितलं आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बच्चू कडू, आशिष देशमुख, संजय काकडे यांचे फोन टॅप करण्यात आले होते, अशी धक्कादायक माहिती पाटील यांनी दिली.
आपल्या कर्तव्याचे भान प्रत्येकाने ठेवले पाहिजेय भारतीय तार अधिनियम अंतर्गत आंतरिक सुरक्षा ठेवण्यासाठी, परदेशी मित्र, राज्याचे संबंध राखण्यासाठी अशी महत्वाची कारण दिली पाहिजेत. फोन टॅप करत असताना प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळी नाव दिली गेली होती. नाना पटोले यांना अमजद खान असे नाव दिले होते. तर बच्चू कडू- निजामुद्दीन बाबू शेख असे नाव दिले होते. परवेज सुतार, रघु सोर्गे, महेश साळुंखे या कॉलेज विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ विकतात म्हणून त्यांचा फोन टॅप झाला पाहिजे असं कारण दिलं होतं, पण त्यांनी थेट नेत्यांची फोन टॅप केले. संभाजीराजे उपोषणाला बसले आहे. मराठा आरक्षण मिळाले पाहिजे, ही सरकारची भूमिका आहे. त्यामुळे संभाजीराजे यांचं समाधान करण्यासाठी बैठका घेतल्या जातील, त्यांनी सहकार्य करावे असं आवाहन वळसे पाटील यांनी केलं.
कोण आहेत रश्मी शुक्ला?
रश्मी शुक्ला या १९८८ बॅचच्या आयपीएस आहेत. नागरी संरक्षण विभागाच्या महासंचालक असलेल्या रश्मी शुक्ला यांची फेब्रुवारी 2021 मध्ये केंद्रात प्रतिनियुक्ती झाली. राज्य सरकारने ६ महिन्यापूर्वी त्यांची नागरी संरक्षण विभागात बदली केली होती. मात्र तुलनेने कमी महत्त्वाचे पद असल्याने त्यांनी निवृत्तीपर्यंत. म्हणजे २०२४ पर्यंत प्रतिनियुक्तीवर जाण्याचा निर्णय घेतला. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात, रश्मी शुक्ला यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळाल्या होत्या. त्यांची पुणे आयुक्तपदी वर्णी लागली होती. पण महाविकास आघाडीच्या काळात त्यांना तुलनेने कमी महत्त्वाचे पद मिळाले. पुण्यात आयुक्त म्हणून रुजु होण्यापूर्वी शुक्ला या राज्य गुप्तवार्ता विभागाच्या (एसआयडी) आयुक्त होत्या.
काय आहे प्रकरण?
वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी शासनाची दिशाभूल करून काही खासगी व्यक्तींचे फोन टॅप केले. त्यांची ही कृती भारतीय टेलिफोन अॅक्टचा गैरवापर करणारी आणि संबंधित व्यक्तींच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारी आहे, असा गंभीर ठपका तत्कालीन मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी चौकशी अहवालात ठेवला होता. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी गुप्त वार्ता विभागाच्या तत्कालीन प्रमुख रश्मी शुक्ला यांच्या अहवालाचा संदर्भ देऊन पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला होता.
इंडियन टेलिग्राम अॅक्टनुसार राजकीय मतभेद, व्यावसायिक तंटे, कोटुंबिक कलह अशा स्वरूपाच्या प्रसंगांमध्ये फोन टॅपिंग करणे अभिप्रेत नाही. मात्र या प्रकरणात मूळ उद्देशापेक्षा वेगळ्या प्रयोजनासाठी या तरतुदीचा गैरवापर करून शासनाची दिशाभूल केल्याचे दिसते.. ही बाब गंभीर असल्याने या फोन टॅपिंग बद्दल रश्मी शुक्ला यांच्याकडून स्पष्टीकरण मागविण्यात आले होते.