मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनेत बंडखोरी करून शिंदे गटात गेलेल्या काही मंत्र्यांची खातेवाटपानंतर मोठी निराशा झाल्याचं दिसत आहे. दादा भुसे हे नाराज असून काल सायंकाळी त्यांनी आपला फोनही बंद करून ठेवला होता, असं समजते.
दादा भुसे हे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये कृषीमंत्री होते. मात्र शिंदे सरकारमध्ये भुसे यांच्यावर बंदरे व खनिकर्म खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. भुसे यांच्याकडे आधीच्या तुलनेत दुय्यम खाते दिल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर दादा भुसे हे नाराज असून काल सायंकाळी त्यांनी आपला फोनही बंद करून ठेवला होता, असं समजते. त्यामुळे आगामी काळात नाराज आमदार आणि मंत्र्यांची समजूत काढण्यासाठी एकनाथ शिंदे यांना तारेवरची कसरत करावी लागण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळाचा आणखी एक विस्तार बाकी असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःकडे १३ खाती ठेवली आहेत. शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ ही खाती असणार आहेत. त्यांच्याकडे इतर कोणत्याही मंत्र्याला न वाटप केलेल्या खात्याचाही कारभार देखील आहे. दरम्यान, खातेवाटपानंतर दादा भुसे नॉट रिचेबल झाल्याची चर्चा सुरु झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सर्व आलबेल नसल्याचे दिसत आहे.