जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित तथा तत्कालीन अवसायक जितेंद्र कंडारेला जामीन मिळाला असल्याची माहिती समोर येत आहे.
बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित तथा अवसायक जितेंद्र कंडारेला पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने इंदोरमधून अटक केली होती. दरम्यान, कंडारेने जामीनसाठी न्यायालयात अर्ज दाखल केलेला होता. त्यानुसार न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज मंजूर केल्याची माहिती प्राप्त होत आहे. दरम्यान, निकालाची प्रत अद्याप समोर आली नसली तरी पोलीस सूत्रांनी कंडारेचा ५० हजाराच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर न्यायालयाने जामीन मंजूर केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तसेच दोन जामीनदार आणि साक्षीदारांवर दबाव टाकू नये, अशा अशा अटी कंडारेला जामीन देतांना घालण्यात आल्या आहेत. दुसरीकडे कंडारेची अजूनही येरवडा कारागृहातून मुक्तता झालेली नसल्याचेही कळते.
पुणे आर्थिक गुन्हे शाखेने बीएचआर घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार अवसायक जितेंद्र कंडारेने इतर आरोपींसोबत मिळून अवघ्या पाच मालमत्ता विक्री करून तब्बल ४८ कोटी ५६ लाख ८२० रुपयांचा अपहार केला आहे. तसेच सन २०२० मध्ये कंडारे व महावीर जैन या दोघांमध्ये तब्बल १४८ वेळेस संभाषण झालेय. तर कंडारेकडून जप्त हार्डडिस्कमध्ये बीएचआरची सन २०२० ची स्कॅन केलेली मिळून आली होती. एवढेच नव्हे तर, आतापर्यंत झालेल्या फॉरेन्सिक ऑडिटमध्ये अंदाजे ६५० कर्जखाती एफ.डी. मॅचिंगकरून निरंक केल्याचे निष्पन्न झाले आहे. परंतू यापैकी बऱ्याच कर्जदारांच्या कर्ज मागणी अर्ज व एफ.डी. मॅचिंग झालेल्या फाईल्स कार्यालय झडतीमध्ये मिळून आलेल्या नाहीत. या सर्व फाईल्स पुराव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असून त्या कुठे लपवून ठेवल्या आहेत?, यासह इतर महत्वपूर्ण मुद्द्यांवर कंडारेची कसून चौकशी करण्यात आली होती. परंतू आता कंडारेचा जामीन झाल्यामुळे सरकारी पक्षाला मोठा धक्का मानला जात आहे.