जालना (वृत्तसंस्था) महाविकास आघाडीतील अनेक आमदार नाराज असून ते आपल्या संपर्कात असल्याचा दावा केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केला आहे. राज्यातील मतदारांनी भाजप-शिवसेनेला कौल दिला असताना शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हाच त्यांच्यातला भगवा रंग संपुष्टात असल्याचंही रावसाहेब दानवे म्हणाले.
भाजपचा भगवा भेसळीचा आहे अशी टीका करणाऱ्या शिवसेना खासदार संजय राऊतांना दानवेंनी प्रत्युत्तर दिलं. भेसळ आमच्यात आहे की त्यांच्यात, असा सवाल दानवेंनी विचारला. दोन-तीन एकत्र आले की त्याला भेसळ म्हणतात, असं दानवे म्हणाले. शिवसेनेनं काँग्रेस राष्ट्रवादीसोबत युती केली, तेव्हा त्यांचा भगवा संपुष्टात आला. त्यांनी अनैसर्गिक युती केली. असंगाशी संग केला, अशी टीका दानवेंनी केली. आता सारे भगवाधारी आमच्याकडे आहेत. उत्तराखंड, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालानं ते दाखवून दिलं आहे. शिवसेनेनं भगव्याऐवजी हिरव्याचं पांघरूण घेतलं आहे. आता इज्जत वाचवण्यासाठी ते भगवा भगवा करतात, अशा शब्दांत दानवेंनी शिवसेनेवर तोफ डागली.
महाविकास आघाडीतील अनेक आमदार नाराज असून ते आपल्या संपर्कात असल्याचा दावा दानवेंनी केला. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर मविआमधले २५ आमदार बहिष्कार टाकणार होते. पण त्यांची कशीबशी समजूत काढण्यात आली. निवडणुका जवळ आल्यावर नाराज आमदार भाजपमध्ये येते. आता त्यांची नावं सांगितल्यास अनेकांची आमदारकी धोक्यात येईल, असं दानवे म्हणाले.