मुंबई (वृत्तसंस्था) भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षातील सर्व इच्छुकांना मंत्रिमंडळात स्थान देता येणार नाही असे स्पष्ट केले आहे. त्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्तारात भाजपकडून अनेक दिग्गजांना डच्चू मिळण्याची चर्चा सुरु झाली आहे.
भाजपकडून कुणाची लागणर लॉटरी?, कुणाचा होणार पत्ता कट ?
भाजपकडून धक्कातंत्राचा वापर करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. शिंदे गटातील 13 ते 14 जणांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याने भाजपमधील इच्छुकांना आापला नंबर लागणार की नाही, अशी धाकधूक आहे. गुजरातमध्ये पहिल्यावेळेस निवडून आलेल्या आमदारांना मंत्रिपदे देण्यात आली होती. तोच फॉर्म्युला राज्यात लागू झाल्यास देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आमदार अभिमन्यू पवार, विधान परिषद सदस्य श्रीकांत भारतीय, डॉ. रणजित पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, प्रा.राम शिंदे, मेघना बोर्डीकर यांची राज्यमंत्रिमंडळात वर्णी लागू शकते. तसेच चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन यांना देखील संधी मिळू शकणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरू आहे. तर मंत्रिमंडळ विस्तारात ज्येष्ठ नेत्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे, दिलीप कांबळे, विद्या ठाकूर, सुधीर मुनगंटीवार, बबनराव लोणीकर, प्रवीण पोटे यांचा समावेश आहे.
शिंदे गटाकडून कुणा-कुणाला मिळणार संधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतून कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील, दादा भुसे, उदय सामंत, संदीपान भुमरे, राज्यमंत्री शंभूराज देसाई, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह अपक्ष राज्यमंत्री राजेंद्र यड्ड्रावार, आणि बच्चू कडू यांनी मंत्रिपदावर असताना शिंदेंना पाठिंबा दिला. यांच्यासह संजय शिरसाट, तानाजी सावंत, संजय राठोड, दीपक केसरकर, योगेश कदमांसह प्रताप सरनाईक, यामिनी जाधव यांना मंत्रिपदाची अपेक्षा आहे. मविआमध्ये मंत्रिपद असणाऱ्यांना मंत्रिपद मिळणार असल्याचे स्पष्ट असले, तरी या व्यतिरिक्त कुणाची वर्णी मंत्रिमंडळात लागू शकते, अशी देखील चर्चा आहे.