चाळीसगाव (प्रतिनिधी) चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी नुकतीच राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची गुप्त भेट घेतली असून, या महत्त्वपूर्ण बैठकीमुळे जळगाव जिल्ह्यातील पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
सुमारे अर्धा तास झालेल्या या बैठकीत चव्हाण यांनी जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैध धंदे, गांजा, ड्रग्स तस्करीसारख्या गंभीर विषयांवर सविस्तर चर्चा केल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. विशेष म्हणजे, आमदार चव्हाण यांनी काही ठोस पुरावेही रश्मी शुक्ला यांना दाखवले, असे सांगितले जात आहे.
या भेटीत काही पोलीस अधिकारी आणि त्यांच्या कार्यशैलीविषयी देखील महत्त्वाची माहिती चव्हाण यांनी महासंचालकांच्या निदर्शनास आणून दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांमध्ये चिंता आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे.
या संदर्भात पत्रकारांनी विचारणा केली असता आमदार मंगेश चव्हाण यांनी या भेटीला दुजोरा दिला असला तरी, “नेमकी काय चर्चा झाली, याचा तपशील मी देऊ शकत नाही,” असे सांगून अधिक माहिती देण्यास नकार दिला.
जरी अधिकृत स्वरूपात बैठकाविषयी सविस्तर माहिती समोर आलेली नसली, तरी जिल्ह्यातील वाढते गुन्हेगारीचं प्रमाण, अमली पदार्थांची वाढती विक्री आणि पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांच्या भूमिका या मुद्यांवर ही भेट केंद्रित होती, असे सूत्रांकडून स्पष्ट करण्यात येत आहे.
या भेटीनंतर जळगाव जिल्ह्यातील पोलीस विभागात अंतर्गत हालचालींना वेग आला असून, काही मोठे बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
















