बुलढाणा (वृत्तसंस्था) : उद्धव ठाकरेंनी बुलढाण्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या केल्या होत्या. या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. याचवेळी शिवसेना-शिंदे गटात जोरदार राडा झाल्यामुळे जमावाला पांगवण्यासाठीपोलिसांना लाठीचार्जही करावा लागला. घटनास्थळी मोठा तणाव निर्माण झाला होता.
शिंदे गटाचे समर्थक आणि ठाकरेंनी नियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्ते अशा दोघांमध्ये यावेळी घमासान झाल्याचं पाहायला मिळालं. हा राडा नियंत्रणात आणताना पोलिसांना अखेर आपली सगळी शक्ती पणाला लावाली लागली होती. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी हा राडा घातला. आमदार संजय गायकवाड यांच्या मुलासह त्यांच्या समर्थकांनी सत्कार समारंभात घुसून काही पदाधिकाऱ्यांना मारहाण केली. विशेष म्हणजे पोलिसांसमोरच हा राडा झाला.
ठाकरे गटाकडून जिल्ह्यातील नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती नुकतीच करण्यात आली होती. या पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. पण आम्ही शिवसेनेचे लोक आहोत, असा दावा करत गायकवाड यांच्या समर्थकांनी गोंधळ घातला. यावेळी शब्दाला शब्द वाढत गेला आणि पोलिसांसमोर दोन्ही गट भिडले.