नवी दिल्ली (वृत्तसंस्था) महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. दुपारी साडेबारा वाजता तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. वारंवार तारीख पुढे जात असल्यानं सुप्रीम कोर्टात आज शिवसेनेच्या वकिलांनी हे प्रकरण मेन्शन केलं होतं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं हे प्रकरण पटलावर घ्यायला मान्यता दिली आहे.
राज्यात सुरु असलेल्या सत्तासंघर्षाच्या नाट्यात शिंदे गटातील १६ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेले. कोर्टात शिंदे-ठाकरे गटामध्ये न्यायालयीन लढाई सुरू आहे. आज दुपारी १२.३० वाजता महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष प्रकरण पटलावर घेण्यात येणार आहे. त्यामुळे शिंदे सरकारचं भवितव्य आजच्या सुनावणीवर अवलंबून असणार आहे.
यापूर्वी 3 आणि 4 ऑगस्ट अशी सलग दोन दिवस सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली होती. तेव्हापासूनच सातत्यानं हे प्रकरण पुढे ढकललं जात होतं. शिवसेनेसाठी हे प्रकरण अत्यंत महत्त्वाचं असल्यामुळे त्यांनी आज हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या वतीनं तातडीनं मेन्शन करण्यात आलं. त्यामुळे आज अखेर या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे.
शिवसेना आमचीच आहे असा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. या कायदेशीर लढाईत शेवटची सुनावणी ४ ऑगस्टला झाली होती. त्यानंतर तिसऱ्यांदा ही सुनावणी पुढे ढकलली आहे. आधी १२ ऑगस्ट, त्यानंतर २२ आणि आता २३ ऑगस्टला ही सुनावणी होणार आहे. त्रिसदस्यीय खंडपीठातील एक न्यायाधीश सोमवारी उपलब्ध नसल्याने ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाच्या यादीनुसार आज (२३ ऑगस्टल) या प्रकरणात सुनावणी होण्याची शक्यता होती. परंतू त्याबाबत संभ्रम होता. परंतू आता दरम्यान, महाराष्ट्राच्या राजकीय पेचप्रसंगातून सर्वोच्च न्यायालयात पोहोचलेल्या अनेक याचिकांमध्ये आता त्यावर आजच सुनवाई होणार आहे. दरम्यान, नागरिकांतर्फे हस्तक्षेप याचिका दाखल करून नागरिक व मतदारांचे म्हणणेसुद्धा एकून घ्यावे, अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली आहे. याचिकाकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी, रंजन बेलखोडे, सौरभ अशोकराव ठाकरे (पाटील) यांनी ॲड. असीम सरोदे यांच्या माध्यमातून दाखल केलेली हस्तक्षेप याचिकेवरही कोर्टात सुनावणी होणार आहे.