नाशिक (वृत्तसंस्था) मुरूम उत्खनन प्रकरणाच्या पडताळणीसाठी तडजोडी अंती तब्बल पंधरा लाखांची लाच स्वीकारणाऱ्या नाशिकच्या तहसीलदारास एसीबीने बेड्या ठोकल्या. या घटनेने महसूल विभागातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती. नरेशकुमार तुकाराम बहिरम (वय ४४, रा. मेरिडियन तुकाराम बहिरम (वय ४४, रा. मेरिडियन गोल्ड, कर्मयोगीनगर) असे लाचखोर तहसीलदाराचे नाव आहे.
बहिरम साडेतीन महिन्यांपूर्वीच नाशिकच्या तहसीलदार पदी नियुक्त झाले आहेत. तालुक्यातील राजूर बहुला येथील जमीन मालकाचे मुरूम उत्खननाबाबत मूल्य नियमानुसार पाचपट दंड, स्वामित्वधन जागा भाडे मिळून एक कोटी २५ लाख ६ हजार २२० रुपयांचा दंड आकारणीची नोटीस तहसील कार्यालयाने बजावली होती. या आदेशाविरुद्ध जमीन मालकाने उपविभागीय अधिकारी कार्यालयात धाव घेत अपील दाखल केले होते. या अपिलावर नुकतीच सुनावणी होऊन हे प्रकरण फेर चौकशीसाठी तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांच्याकडे सोपविण्यात आले होते.
या मिळकतीमधील उत्खनन केलेला मुरूम त्याच जागेत वापर झाल्याचे जमिनीच्या मालकांनी त्यांच्या कथनात नमूद केले होते. याबाबत पडताळणी करण्याकामी संशयित तहसीलदार बहिरम यांनी उत्खनन झालेल्या ठिकाणी भेट दिली. याबाबत जमीनमालक यांना निरीक्षण स्थळी बोलावण्यात आले होते; परंतु जमीनमालक या वयोवृद्ध व आजारी असल्याने त्यांनी तक्रारदार यांना कायदेशीर कारवाईकामी अधिकार पत्र दिलेले आहे.
लाचखोर तहसीलदारांनी स्थळ निरीक्षण वेळी तक्रारदाराची भेट घेत तडजोडीअंती १५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला होता. लाचलुचपत विभागाने पडताळणी केली असता शनिवारी (दि. ५) बहिरम यांच्या कर्मयोगीनगर येथील आलिशान घर परिसरात सापळा लावण्यात आला होता. तक्रारदाराने बहिरम यांचे घर गाठून रक्कम दिली असता लाचखोर तहसीलदारास रंगेहात पकडण्यात आले.
एसीबीने ताब्यात घेताच त्यांच्या घरझडतीचा कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत सुरू होता. मात्र, पथकाच्या हाती किती घबाड लागले, माहिती मिळू शकली नाही. ही कारवाई अधीक्षक शर्मिष्ठा घारगे – वालावलकर, अपर अधीक्षक रेड्डी व उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संदीप घुगे, स्वप्नील राजपूत, नाईक गणेश निबाळकर, प्रकाश महाजन व शिपाई नितीन नेटारे आदींच्या पथकाने केली.