चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील लासुर ते सत्रासेन रोडवर सत्रासेन घाटातील वळण रस्त्यावर संशयित भरधाव कार थांबवल्यानंतर झडती घेतली असता अवैध गावठी कट्टा आणि जिवंत काडतूसं आढळून आल्यानंतर थोड्यावेळा करिता पोलीसही चक्रावून गेले होते. दरम्यान, चोपडा ग्रामीण पोलिसांनी कारमधील पाच जणांना ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
१३ एप्रिल रोजी चोपडा ग्रामीण पोलीसांकडून लासुर ते सत्रासेन रोडवर सत्रासेन घाटातील मुळ वळण रस्त्यावर नाकाबंदी सुरु होती. याचवेळी सत्रासेनकडून कार (क्रमांक MH 01 BF, 0708) ही वेगात येतांना दिसली. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी कार थांबवून गाडीतील व्यक्तिंना खाली उतरवित वाहनाची तपासणी केली. कारच्या डिक्कीमध्ये एका पिशवीत दोन गावठी पिस्टल व ५ जिवंत काडतुसे मिळून आलीत.
किरण कमलाकर शिंदे (२४) रा. लासलगाव ता.निफाड जि.नाशिक, टिनु उर्फ दशरथ रामचंद्र पवार (वय ३५), रामनाथ विश्वनाथ दाभाडे ( वय ३०), युवराज भगवान माळे (वय २६, तिघं रा. पिंपळगाव बसवंत नगर उंबरचखेड रोड भाव नगर पारधीवाडा) व वाहन चालक केशव बंडुनी बखरे (वय, ४६ रा. पिंपळगाव बसवंत नगर उंबरचखेड रोड ता. निफाड जि. नाशिक) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
संशयितांविरुद्ध चोपडा ग्रामीण पोलिसात आर्म अॅक्टसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक कावेरी कमालकर करीत आहेत. सदर कारवाई पोउपनि. अमरसिंग वसावे, सहायक फौजदारकिशोर शिंदे, पो हे कॉ. लक्ष्मण शिंगाणे, भरत नाईक, पो कॉ. सुनिल कोळी, प्रमोद पारधी व विशाल रमण जाधव आदिंनी केली.
















