मुंबई (वृत्तसंस्था) ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना कुख्यात गॅंगस्टर लॉरेंस बिश्नोईच्या (Lawrence Bishnoi) नावाने जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. मोबाईलवर शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत यांनी पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यानंतर पुण्यातून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. संजय राऊत यांच्या मोबाईलवर हा धमकीचा मेसेज आला होता. “हिंदू विरोधी, तुम्हाला मारून टाकू, दिल्लीत भेटा सिद्धू मुसेवालाप्रमाणे एके-47 ने मारून टाकू. लॉरेन्सकडून मेसेज आहे. सलमान आणि तुम्ही तयार राहा,” असे या मेसेजमध्ये म्हटलं आहे. तसेच संजय राऊत यांना शिवीगाळही करण्यात आली आहे. या मेसेज नंतर पोलिसांनी तात्काळ संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. धमकी देणारा व्यक्ती पुण्यातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतल्याचेही समोर आले आहे.