नागपूर (वृत्तसंस्था) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना जीवे मारण्याची धमकी (Death Threats) मिळाली आहे. नितीन गडकरी यांच्या नागपूरमधील कार्यालयात (Nitin Gadkaris Nagpur Office) खंडणीच्या मागणीसाठी एकामागून एक असे तीन फोन कॉल आले आहेत.
दाऊद इब्राहीम नावाने एकामागून एक तीन फोन !
धमकी देणाऱ्याने दाऊद इब्राहीम (Dawood Ibrahim) असा शब्द उच्चारत आम्हाला १०० कोटींची खंडणी (Extortion) दिली नाही तर गडकरींना जीवे मारू अशी धमकी दिली. शनिवारी त्यांच्या नागपूर येथील जनसंपर्क कार्यालयात हे धमकीचे फोन आले. सकाळी ११.२९ वाजता पहिला फोन आला. त्यानंतर आणखी दोन फोन आले. एक फोन ११.३५ वाजता तर तिसरा फोन हा १२.३२ वाजता आला. कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीने त्याची माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनीही तातडीने गडकरींच्या जनसंपर्क कार्यालयात धाव घेऊन तपास सुरू केला.
कर्नाटकातून फोन आल्याचे स्पष्ट ; गडकरींच्या सुरक्षेत मोठी वाढ !
नागपूरमधील ऑरेंज सिटी रुग्णालयाजवळ नितीन गडकरी यांचं संपर्क कार्यालय आहे. आज सकाळपासून तीन वेळा गडकरी यांच्या कार्यालयात दाऊदच्या नावाने फोन आले. पोलिसांच्या माहितीनुसार, हा फोन कर्नाटकच्या एका भागातून करण्यात आला होता. आता पोलिस फोन करणाऱ्याचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार गडकरी सध्या नागपुरात असून एका कार्यक्रमात आहेत. हा धमकीचा कॉल आल्यानंतर त्यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. तसेच त्यांचे निवासस्थान आणि कार्यालयाचीही सुरक्षा वाढविण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीप्रमाणे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपुरातच आहेत.