धुळे (प्रतिनिधी) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे पोलीस दलाकडून नाकाबंदी करून सातत्याने मोठ-मोठ्या कारवाया सुरू असताना धुळे तालुका पोलिसांनी दीव-दमण निर्मित मद्याची नंदुरबार येथे होणारी तस्करी रोखत चौकडीला बेड्या ठोकल्या. संशयीताच्या वाहनातून तब्बल सहा लाख रुपये किंमतीचे मद्य जप्त करण्यात आले. अवैधरीत्या कर चुकवून हे मद्य आणले जात असताना धुळे तालुका पोलिसांनी पाठलाग करीत वाहन पकडले.
या आरोपींना अटक
पोलिसांनी जयेश शैलेश डामरे (22, रा.सर्वोदय सोसायटी, वृंदावन अपार्टमेंन्ट, तिन बत्ती नानी दमन), गणेश विलास सोनवणे (21, रा.दिलीप नगर, नारायण पार्क, जयेश भायजी चाळ, नाणी दमन), निलेश कुमार सदगुनभाई हरीजन (28, रा.झापाबार धाकली निवाडी, रुम नं-4 प्रवीणभाई चाळ, नाणी दमन), हार्दीक शैलेश ओड (24, रा.मशाल चौक, दीपांजली अपार्टमेंन्ट, साई कृपा, नाणी दमन) या संशयीतांना अटक केली आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
धुळे तालुक्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना नंदुरबार जिल्ह्यात वाहनाद्वारे मद्याची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी 24 रोजी रात्री मुंबई-आग्रा रोडवर पुरमेपाडा गावाजवळ नाकाबंदी केली. मारोती इग्निस (डी.डी.03 एम.3613) व महिंद्रा टीयुव्ही (जी.जे.15 सी.एफ.2742) आल्यानंतर पोलिसांनी थांबवण्याचा इशारा केल्यानंतर आरोपींनी पोलिसांच्या अंगावर वाहन नेल्याने त्यांनी रस्त्याच्या कडेला उडी मारली व त्यानंतर पाठलाग करून दोन्ही वाहने ताब्यात घेण्यात आले. वाहन तपासणीदरम्यान त्यात दीव-दमन निर्मित सहा लाखांचे अवैध मद्य आढळल्याने ते जप्त करण्यात आले तसेच 20 लाख रुपये किंमतीचे दोन वाहन जप्त करण्यात आले.
यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, पोलीस उपअधीक्षक संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील, हवालदार किशोर खैरनार, हवालदार कुणाल पानपाटील, हवालदार उमेश पवार, कॉन्स्टेबल विशाल पाटील, धीरज सांगळे, चालक हवालदार महेंद्र पाटील आदींच्या पथकाने केली.
तपासात अनेक बाबी समोर येणार
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना धुळे पोलीस दलाने प्रतिबंधीत मद्य जप्त केले आहे. हे मद्य संशयीत नंदुरबारला कुणाला देणार होते व त्याचे विल्हेवाट नेमकी कशी लावण्यात येणार होती वा कुणाला हे मद्य देण्यात येणार होते हे आरोपींच्या कसून चौकशीत निष्पन्न होणार आहे. निवडणूक काळात झालेल्या कारवाईने मात्र खळबळ उडाली आहे.