कानपूर (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राज्यातील पश्चिम भागात भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना मोठ्या विरोधाचा सामना करावा लागत आहे. प्रचारादरम्यान अनेकांना काळे झेंडे दाखवण्यात आले, तर काही जणांवर चिखलफेक आणि दगडफेक केल्याच्या घटना घडल्या आहेत.
२०१७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने पश्चिम उत्तर प्रदेशात मोठा विजय मिळवला होता. मात्र, यावेळी समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय लोकदलाची युती आणि शेतकरी आंदोलनामुळे ग्रामस्थांची नाराजी यामुळे येथे सत्ताधाऱ्यांची मोठी अडचण होत आहे. अशाच एका प्रकरणात शिवलखास विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार मनिंदरपाल सिंग यांच्यावर २४ जानेवारी रोजी चुर गावात हल्ला झाला होता. या प्रकरणात सिंग यांनी तक्रार दाखल केली नाही, परंतु पोलिसांनी स्वतःहून या प्रकरणाची दखल घेतली आणि गुरुवारी २० नावांसह आणि इतर ६५ अज्ञात लोकांविरुद्ध एफआयआर नोंदवला.
सिंह म्हणाले, माझ्या ताफ्यातील ७ वाहनांवर दगडफेक करण्यात आली, तरीही मी या संदर्भात तक्रार दाखल केलेली नाही. हे आमचेच लोक आहेत, मी त्यांना माफ केले. लोकशाहीत मते मागणाऱ्यांबाबत अशा घटना घडू नयेत.” पोलिस एफआयआरनुसार, ज्या लोकांनी भाजप नेत्याच्या ताफ्यावर दगडफेक केली त्यांच्याकडे राष्ट्रीय लोकदलाचा झेंडा होता. सरधना पोलिस स्टेशनचे प्रभारी लक्ष्मण वर्मा यांनी यासंदर्भात सांगितले की, आम्ही घटनेच्या व्हिडिओ फुटेजद्वारे त्यांची ओळख पटवत आहोत. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
गुरुवारी संध्याकाळी मुझफ्फरनगरमधील खतौली येथील भाजप आमदार आणि विद्यमान उमेदवार विक्रम सैनी यांना भैंसी गावात शेतकऱ्यांच्या जमावाने घेराव घातला आणि भाजपविरोधी घोषणा दिल्या. यावेळी अनेक आंदोलक ‘तुम्ही ५ वर्षांनी इथे आलात’ अशा घोषणा देत होते. रिपोर्टनुसार, सैनी यांनी दिल्लीजवळील सिंघू सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर टीका केली होती. सैनी यांना काही दिवसांपूर्वी त्यांच्या मतदारसंघातील मुन्नावर कलान गावात अशाच आंदोलनाला सामोरे जावे लागले होते. या आंदोलनांबाबत त्यांना विचारले असता सैनी म्हणाले की, ‘ही काही नवीन गोष्ट नाही. निवडणुकीच्या प्रचारात अशा घटना घडत असतात.