इंदौर (वृत्तसंस्था) इंदूरमध्ये सेक्स रॅकेटमध्ये (Sex racket in indore) पकडलेल्या मुलींनी धक्कादायक खुलासा झाला आहे. यामध्ये पकडल्या गेलेल्या थायलंडमधील मुलींपैकी ४ मुली आधी पुरुष होत्या. लिंग बदल झाल्यानंतर त्या भारतात आल्या. त्यांच्या पासपोर्टवरही पुरुष असे लिहिलेले होते. हे सर्वजण स्पा सेंटरमध्ये काम करण्याच्या नावाखाली देहविक्री करायचे. याप्रकरणी पोलिसांनी सर्वांना अटक केली असून त्यांची रवानगी तुरुंगात केली आहे.
संबंधित घटना मध्य प्रदेशातील इंदौर येथील आहे. महिला पोलीस ठाण्याच्या प्रभारी ज्योती शर्मा यांनी सांगितलं की, सेक्स रॅकेटच्या ठिकाणी छापा टाकल्यानंतर पोलिसांनी सर्व मुलींना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर आरोपींच्या सर्व कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. यामध्ये काही विदेशी तरुणींचे पासपोर्टही होते. यातील चार मुलींच्या पासपोर्टवर पुरुष लिहिल्याचं पोलिसांना आढळलं. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता ते आधी पुरुष असल्याचं समोर आलं. पण त्यांनी लिंग परिवर्तन करून सेक्स वर्कर बनल्याचं पोलिसांना सांगितलं.
याबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, मसाज पार्लरमधून अटक करण्यात आलेल्या दोन मुलींना यापूर्वीही देखील अटक करण्यात आली होती. तसेच स्पा सेंटरचा व्यवस्थापक संजय वर्माला देखील यापूर्वी अटक करण्यात आली होती. अटक केलेल्या थायलंडच्या तरुणींनी सांगितलं की, जेव्हा त्यांना पहिल्यांदा सेक्स रॅकेटमध्ये अटक केलं होतं. तेव्हा कायदेशीर कारवाईसाठी त्यांचे पासपोर्ट जप्त करण्यात आले होते. तसेच खटला निकाली लागेपर्यंत देश सोडून जाऊ शकत नाही, या अटीवर त्यांना जामीन दिला होता.
जामीन मिळाल्यानंतर अशा स्थितीत भारतात जीवन जगणं आव्हानात्मक होतं. कारण पासपोर्टशिवाय ते आपल्या देशात जाऊ शकत नव्हत्या. त्यामुळे वेश्याव्यवसाय करण्यावाचून त्यांच्याकडे अन्य पर्याय नसल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं आहे. ६ जानेवारी रोजी सायंकाळी गुन्हे शाखा आणि महिला पोलीस ठाण्याने संयुक्त कारवाई करत विजय नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शगुन आर्केडमध्ये सुरू असलेल्या स्पा पार्लरवर छापा टाकला होता. यावेळी घटनास्थळावरून १८ जणांना अटक केली होती.
















