जळगाव (प्रतिनिधी) युवासेना प्रमुख आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेपूर्वी आ.किशोरआप्पा पाटील यांना जबर धक्का बसला आहे. कारण माजी आमदार आर.ओ. पाटील यांच्या कन्या, पाचोरा निर्मल सिड्सच्या संचालिका आणि आ. पाटील यांची बहिण वैशालीताई सूर्यवंशी यांनी शिवसेना कार्यालय ताब्यात घेतले आहे. यावेळी आ. पाटील यांचे बॅनर देखील काढून टाकले आहे.
आमदार किशोर पाटील हे शिंदे गटाचे आमदार असून त्यांच्या बहिण वैशाली सूर्यवंशी यांनी उद्धव ठाकरेंसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. तशात युवासेना प्रमुख आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेला 9 ऑगस्ट रोजी जळगाव जिल्ह्यातून सुरुवात होत आहे. पाचोऱ्यातून ते आपल्या शिवसंवाद यात्रेचा प्रारंभ करत असल्यामुळे शहरातील शिवसेना कार्यालयात प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीपूर्वी शिवसेना संपर्क कार्यालयावर असलेला आमदार किशोर पाटील यांच्या नावाचा फलक काढण्यात आला आहे.
बैठकीत वैशालीताई सूर्यवंशी यांनी सांगितले की, हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावरची निष्ठा आणि माझे वडील स्व. तात्यासाहेब आर. ओ. पाटील यांनी दाखवलेल्या मार्गावर मी चालत आहे. त्यावेळी, अनेक संकटे माझ्यासमोर आली आणि पुढेही येणार आहेत. तरी, या सर्व गोष्टींचा विचार करून मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे, एकनिष्ठ होऊन काम करेन, असा शब्द त्यांना दिला.