मुंबई (वृत्तसंस्था) छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेता आणि बिग बॉस १३चा विजेता सिद्धार्थ शुक्लाचे निधन झाले आहे. वयाच्या ४०व्या वर्षी हृदयविकाराचा झटका आल्याने सिद्धार्थ शुक्लाची प्राणज्योत मालवली. मुंबईतील कूपर रुग्णालयाने त्याला मृत घोषित केलं आहे.
अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने बुधवारी रात्री झोपण्यापूर्वी काही औषधे घेतली होती. त्यानंतर आज सकाळी त्याला कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी सिद्धार्थचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे समोर आले. अभिनेता, होस्ट आणि मॉडेल आहे जो हिंदी टेलिव्हिजन आणि चित्रपटांमध्ये प्रामुख्यानं काम करत होता. तो ‘ब्रोकन बट ब्यूटीफुल ३’, ‘बालिका वधू’ आणि ‘दिल से दिल तक’मधील भूमिकांसाठी ओळखला जातो. तो बिग बॉस १३ आणि फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी ७ च्या रिअॅलिटी शोचा विजेता आहे. त्यानं सावधान इंडिया आणि इंडियाज गॉट टॅलेंट हे शो होस्ट केले आहेत. त्याने डिसेंबर २००५ मध्ये आशिया, लॅटिन अमेरिका आणि युरोपमधील इतर ४० सहभागींना हरवून जगातील सर्वोत्कृष्ट मॉडेलचं विजेतेपद पटकावले. २००८ च्या ‘बाबुल का आंगन छुटे ना’ या शोमधील मुख्य भूमिकेतून त्यानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. २०१४ मध्ये, शुक्लानं ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’मध्ये सहाय्यक भूमिकेतून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.