चंद्रपूर (वृत्तसंस्था) आपसी वादातून दोन मित्रांनी चाकुने भोसकून सहकारी मित्राचाच खून केल्याची धक्कादायक घटना ब्रह्मपुरी येथे ४ जुलैच्या रात्री १०.३० वाजेच्या दरम्यान घडली. कपिल खुशाल भैसारे (२२) असे मृत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी मुन्ना राऊत (४५) व रोहित भैसारे (३२) रा. गुजरी वार्ड, ब्रह्मपुरी या दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कपिल भैसारे, मुन्ना राऊत व रोहित भैसारे हे तिघेही मंगळवारी रात्रीच्या सुमारास दारू पिऊन गुजरी वार्ड चौकात बसून आपसात चर्चा करीत होते. या चर्चेचे रुपांतर कपिलसोबत वादात झाले. यावेळी मुन्ना राऊत याचा राग अनावर होऊन त्याने आपल्याजवळील धारदार चाकुने कपिल भैसारेच्या छातीवर दोन तिन वार करून तिथून पळ काढला.
थोड्यावेळानंतर कपिलचा भाऊ फिरायला बाहेर आला असता त्याला कपिल रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्याने गंभीर जखमी अवस्थेत कपिलला ब्रह्मपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. त्यानंतर तपासचक्र फिरवीत ब्रह्मपुरी पोलिसांनी दोन्ही आरोपींना बुधवारी पहाटेच्या सुमारास नागभीड येथून ताब्यात घेतले. दोघं आरोपींविरोधात कलम ३०२, ३४ भादंवी, अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायदा ३, २ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.