मुंबई (वृत्तसंस्था) कोरोना पाठोपाठ आता महाराष्ट्रात ‘बर्ड फ्लू’ च्या रुपाने आणखी एका संकटाने शिरकाव केल्याचे दिसत आहे. मुंबईतल्या चेंबूर टाटा नगर वसाहतीत ९ कावळ्यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. यासंदर्भात मुंबई पोलिसांनी महानगरपालिकेला कळवलंय. कावळ्यांचे शव विच्छेदन झाल्यावर मृत्यूचं कारण समोर येईल. तर नवी मुंबईतल्या खारघरमध्ये स्टेशन तसंच भारती विद्यापीठ परिसरात काही कावळे आणि साळुंख्या मृत अवस्थेत सापडल्या आहेत.
ठाणे पाठोपाठ मुंबईत ही पक्ष्याचा मृत्यू त्यामुळे चिंतेचं वातावरण आहे. गेल्या दोन दिवसांपासून काही कावळे आणि साळुंखी मरून पडत असल्याचं स्थनिक नागरिकांनी सांगितलंय. यामुळे येथील नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. अमरावतीच्या बडनेरामधल्या दत्तवाडी परिसरात ४० कोंबड्या दगावल्यायत. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिक चिंतेत सापडलेत. दगावलेल्या या कोंबडयांचे स्वॅब घेण्यात आले असून ते अमरावतीच्या जिल्हा पशुवैद्यकीय रुग्णालयात तपासणीसाठी पाठवलेत. त्याचा अहवाल आल्यानंतरच कोंबड्याचा मृत्यू नेमका कशानं झाला हे स्पष्ट होणार आहे. तर दुसरीकडे मेळघाट आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या दिया गावाजवळ देखील शेकडो कावळे मृतावस्थेत आढळून आल्यानं खळबळ उडालीय. नेमक्या कुठल्या आजारानं कावळे दगावले याचं कारण शोधण्याचं आवाहन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसमोर आहे.
दरम्यान, राज्यात बर्ड फ्ल्यूचा धोका वाढताना दिसत आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. बर्ड फ्ल्यूच्या संसर्गाबाबत चर्चा करण्यासाठी संध्याकाळी ५ वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.