अमरावती (वृत्तसंस्था) दारूच्या नशेत झालेल्या वादात मुलाने वडिलांना लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करून त्यांची हत्या केली. ही घटना रविवार, ३ डिसेंबर रोजी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेंदोळा बु. येथे घडली. या प्रकरणी आरोपी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. नवरंग भोसले (७० रा. शेंदोळा बु.), असे मृतक तर नमन भोसले (३५ रा. शेंदोळा बु.), असे आरोपीचे नाव आहे.
रविवारी रात्री नवरंग भोसले हे मद्य प्राशन करून घरी आले. त्यानंतर ते जेवण करायला बसले. तेवढ्यात मुलगा नमन हासुद्धा मद्यधुंद अवस्थेत घरी आला. त्याने वडील नवरंग यांना तू किती दारू पिला, अशी विचारणा केली. त्यावर मी तुझ्या पैशाने नाही पिलो, असे उत्तर नवरंग यांनी मुलगा नमनला दिले. या कारणावरून त्यांच्यात वाद निर्माण झाला. या वादात नमनने वडील नवरंग यांना लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. त्यात नवरंग हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मृतक नवरंग यांची पत्नी प्यारन भोसले (६० रा. शेंदोळा बु.) यांनी नांदगाव पेठ ठाण्यात तक्रार दाखल केली.