जळगाव (प्रतिनिधी) छत्रपती श्री. शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावरील ‘शिवाई देवराई’ आणि वन उद्यानाचे लोकार्पण शिवजयंतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटनमंत्री गिरीश महाजन आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे, अशी माहिती जुन्नर वन विभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी दिली.
यावेळी सातपुते म्हणाले, शिवनेरी संवर्धन आणि विकास प्रकल्पा अंतर्गत वन विभागाच्या वतीने पहिल्या टप्पात अडिच एकर क्षेत्रावर तीन वन उद्यान आणि शिवाई देवराई साकारण्यात आली आहे. पुढील विविध टप्प्यांमध्ये हे क्षेत्र २५ एकर पर्यंत वाढविणार आहोत. देवराईची संकल्पना सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेच्या वतीने मांडली होती. संस्थेच्या माध्यमातून जैन इरिगेशनच्या सामाजिक दायित्व निधीतून सुक्ष्म आणि ठिबक सिंचनाची यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे शिवनेरी गडावरील पाण्याच्या प्रत्येक थेंबाच्या शास्त्रोक्त वापरातून पाण्याचा संतुलित वापर होणार आहे. देवराईचा हा पहिला टप्पा असून, आम्ही हे क्षेत्र टप्याटप्याने वाढविणार आहोत. ही देवराई महाराष्ट्रातील गड किल्ले विकासात पर्यावरण संवर्धनासाठी मार्गदर्शक ठरेल.
शिवाई देवराईच्या माध्यमातून काम करणे हे भाग्य – अशोक जैन
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन याबाबत म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानी शिवाई देवराईच्या माध्यमातून काम करण्यास मिळाले हे आमचे भाग्य असून, सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेने आम्हाला ठिबक आणि सुक्ष्म सिंचन तंत्रज्ञानाची मागणी केली होती. ही मागणी आणि वन विभागाच्या माध्यमातून पूर्ण केली असून. साडेसात एकरसाठीची यंत्रणा बसविण्यात आली आहे. भविष्यात आम्ही शिवनेरी साठी आणखी काम करणार आहोत.”
किल्ले संवर्धनासाठीची पहिली आदर्श देवराई ठरेल
शिवनेरी संवर्धन आणि विकास प्रकल्पावर आम्ही प्रशासन आणि वन विभागासोबत सातत्याने काम करत आहोत. किल्ल्यावरील उपलब्ध पाण्यावर जास्तीत जास्त वनराई विकसित व्हावी. यासाठी आम्ही जैन उद्योग समूहाला विनंती केली होती. आमच्या विनंतीला मान देत कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन यांनी ठिबक आणि सुक्ष्म सिंचन तंत्रज्ञान शिवनेरीसाठी विनामूल्य उपलब्ध केले. यामुळे शिवाई देवराई ही राज्यातील किल्ले संवर्धनासाठीची आदर्श देवराई ठरेल, असा आम्हाला विश्वास आहे. सांस्कृतिक धोरणातील गड किल्ले व पुरातत्त्व वारसा समितीने आमच्या देवराई संकल्पनेची शिफारस केली आहे. सांस्कृतिक धोरणात प्रत्येक किल्ल्यावर देवराई उभारण्याचा समावेश होईल हा आम्हाला विश्वास आहे. असे सह्याद्री गिरिभ्रमण संस्था, जुन्नर (जि.पुणे) अध्यक्ष राहुल जोशी यांनी आपल्या प्रतिक्रियेत सांगितले.