मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाची रणधुमाळी रंगली. राज्यातील ३२ जिल्ह्यातील १०६ नगरपंचायती आणि दोन जिल्हा परिषदांच्या ४१३ जागांसाठी आज मतमोजणी झाली. १०६ पैकी ९७ नगरपंचायतींचे निकाल हाती आले आहेत. ९ नगरपंचायतींचे निकाल उद्या जाहीर होणार आहेत.
राज्यातील OBC आरक्षण स्थगित झाल्यानंतर नगरपंचायतीतील खुल्या ३३६ जागांवर काल मतदान पार पडलं होतं. आज या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. विभागवार पाहिलं तर कोकणात भाजपला दोन जागांवर तोटा सहन करावा लागला आहे तर राष्ट्रवादीला तितक्याच जागांवर फायदा झालाय. या निवडणुकीमध्ये सर्वाधिक नगरसेवक भाजपचे निवडून आले असले तरी सर्वाधिक नगरपालिका मात्र राष्ट्रवादीच्या ताब्यात गेल्या आहेत. राज्यात २०१७ च्या तुलनेत या वर्षीच्या निवडणुकीत भाजपला तब्बल सात नगरपालिकेचा तोटा झालाय. तर तब्बल राष्ट्रवादीला १३ अधिक नगरपंचायतीवर सत्ता मिळाली आहे.
कोणत्या पक्षाला किती जागा?
राज्यातल्या १०६ नगरपंचायतींच्या तब्बल १८०२ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपनं सर्वाधिक ३८९ जागा जिंकून अव्वल नंबर मिळवलाय. तर राष्ट्रवादी काँग्रेसनं ३८२ जागा मिळवून दुसरा क्रमांक पटकावलाय. शिवसेना २८४ जागांसह तिसऱ्या क्रमांकावर तर २७४ जागांसह काँग्रेस अखेरच्या स्थानावर राहिलीय.
अजून काही जागांचे निकाल यायचे आहेत. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीतली पहिल्या क्रमांसाठीची काँटे की टक्कर कायम आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटलांनीही भाजपच राज्यात एक नंबरचा पक्ष असल्याचा दावा केला आहे. तर काँग्रेसच्या ताब्यात २२ नगरपंचायती आल्या आहेत. १७ वरुन आम्ही २२ वर गेलोय, काँग्रेसची कामगिरी समाधानकारक आहे. विदर्भात काँग्रेस पुढे आहे. कोकणात खाते खोललंय. राज्यात तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेस असल्याची प्रतिक्रीया प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
‘या’ दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे, शशिकांत शिंदे, शिवसेनेचे एकनाथ शिंदे, रामदास कदम, शंभुराजे देसाई, भाजपचे गिरीश महाजन, काँग्रेसचे नाना पटोले या प्रमुख नेत्यांना धक्का बसला आहे. तर अशोक चव्हाण, यशोमती ठाकूर, अब्दुल सत्तार, पंकजा मुंडे, सुनील तटकरे, शशिकांत शिंदे, प्रणिती शिंदे यांनी आपापले गड कायम राखले आहेत. रोहित पाटील, रोहित पवार या तरुण नेत्यांनी चमकदार कामगिरी करत ठसा उमटवला आहे.
कोरेगावमध्ये शशिकांत शिंदेंना धक्का
माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांना शिवसेनेने जोरदार धक्का दिला आहे. जिल्हा बँक निवडणुकीचा वचपा काढला आहे. कोरेगाव नगरपंचायतीच्या १७ जागांपैकी १३ जागा शिवसेना आमदार महेश शिंदे यांच्या पॅनेलला आणि ४ जागा राष्ट्रवादी पॅनेलला मिळाल्या आहेत. कोरेगाव नगरपंचायतीत सत्तांतर झाले आहे. शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखालील कोरेगाव शहर विकास परिवर्तन पॅनेल विजयी झाले असून त्यांनी आपल्या ताब्यात सत्ता खेचून आणली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपला संमिश्र यश
सिंधुदुर्ग जिल्हा नगरपंचायतीत भाजपला संमिश्र यश मिळालं. सिंधुदुर्गातील चार पैकी दोन नगरपंचायतीत शिवसेनेने बाजी मारली आहे. दोडामार्ग, वैभववाडी नगरपंचायतीत भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे. तर कुडाळमध्ये शिवसेना-राष्ट्रवादीने ९ जागा जिंकल्या आहेत तर भाजपला ८ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. देवगड नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपच्या या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला. गेल्या निवडणुकीत एकही उमेदवार नसलेल्या देवगड नगरपंचायतीमध्ये शिवसेनेने यंदा ९ जागांवर विजय मिळवला आहे. तर भाजपने आठ जागांवर विजय मिळवला आहे.
बीडमध्ये धनंजय मुंडेंना हादरा
बीड जिल्ह्यातील पाच नगरपंचायतींपैकी आष्टी, पाटोदा, शिरूर या तीन नगरपंचायतमध्ये भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासाठी हा मोठा हादरा मानला जात असून पंकजा मुंडे यांनी बाजी मारली आहे. केज नगर पंचायत जनविकास आघाडीच्या ताब्यात गेली आहे, तर भाजपचे ज्येष्ठ नेते राजू मुंडे यांच्या ताब्यातील वडवणी नगरपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात गेली आहे.
नांदेडमध्ये काँग्रेसने गड राखला
नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तीनही नगरपंचायतीत काँग्रेसने बाजी मारली आहे. काँग्रेसने नायगाव, अर्धापूर, माहूर नगरपंचायतीवर काँग्रेसने सत्ता मिळवली आहे. माहूर नगरपंचायतीत १७ पैकी ६ जागांवर यश मिळालं आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसला सात आणि शिवसेनेला तीन जागांवर यश मिळालं आहे.
कर्जत तालुक्यात रोहित पवारांचा करिष्मा
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचा करिष्मा पहायला मिळाला. विधानसभा निवडणुकीत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांचा पराभव करत रोहित पवार यांनी राजकारणात पाऊल टाकलं. त्यानंतर झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही रोहित पवार यांनी शिंदे यांना मात दिली होती. त्यानंतर आता नगरपंचायतीच्या निवडणुकतही शिंदे यांच्यावर रोहित पवार यांनी कुरघोडी करत तिहेरी हॅटट्रीक साधली आहे. इथल्या १७ जागांपैकी रोहित पवारांनी ११ जागांवर विजयश्री खेचून आणली. एका जागेवर राष्ट्रवादीचा बिनविरोध विजय झालाय. तर राम शिंदे यांच्या गटाला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावं लागलं आहे.
फायदा की तोटा?
कोकण २०१७ २०२२ फायदा / तोटा
भाजप ५ ३ २ तोटा
राष्ट्रवादी ३ ५ २ फायदा
काँग्रेस ० १ १ फायदा
शिवसेना ५ ४ १ तोटा
पश्चिम महाराष्ट्र २०१७ २०२२ फायदा / तोटा
भाजप ५ ४ १ तोटा
राष्ट्रवादी ३ ७ ४ फायदा
काँग्रेस ३ १ २ तोटा
शिवसेना ० २ २ फायदा
उत्तर महाराष्ट्र २०१७ २०२२ फायदा / तोटा
भाजप ४ ४ ०
राष्ट्रवादी ३ ४ १ फायदा
काँग्रेस १ ० १ तोटा
शिवसेना ४ ३ १ तोटा
मराठवाडा २०१७ २०२२ फायदा / तोटा
भाजप ९ ७ २ तोटा
राष्ट्रवादी ३ ७ ४ फायदा
काँग्रेस ६ ४ २ तोटा
शिवसेना २ ४ २ फायदा
विदर्भ २०१७ २०२२ फायदा / तोटा
भाजप ८ ६ २ तोटा
राष्ट्रवादी १ ३ २ फायदा
काँग्रेस १४ १२ २ तोटा
शिवसेना ० १ १ फायदा
महाराष्ट्र २०१७ २०२२ फायदा / तोटा
भाजप ३१ २४ ७ तोटा
राष्ट्रवादी १३ २६ १३ फायदा
काँग्रेस २४ १८ ६ तोटा
शिवसेना ११ १४ ३ फायदा