नवी दिल्ली (वृत्तसंस्था) काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वीरप्पा मोईली यांनी विधानसभा निवडणुकीतील पराभवातून निर्माण झालेल्या पक्षाच्या जखमा भरून काढण्याचा प्रयत्न केलाय. मोईली म्हणाले, भाजप आणि इतर पक्ष येत-जात राहतील. मात्र, काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे, जो कायम राहील. यासोबतच मोईलींनी पक्षश्रेष्ठींना पुन्हा सत्तेत येण्यासाठी आपला दृष्टिकोन बदलण्यास सांगितलंय.
मोदींनंतर भाजप टिकणं फार अवघड
गुलाम नबी आझाद यांच्या घरी G-23 नेत्यांच्या बैठकीनंतर वीरप्पा मोईली यांचं हे वक्तव्य समोर आलंय. मोईली पुढे म्हणाले, निवडणुका जिंकण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी जीवन, समाज आणि प्रत्येक गोष्टींकडं पाहण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे. काँग्रेस हा चिरंतन पक्ष आहे. यासाठी मोईलींनी नेहरूंच्या विधानाचं उदाहरणही दिलंय. जवाहरलाल नेहरू म्हणाले होते, काँग्रेसनं गरीब आणि मागासांसाठी काम करणं थांबवलं, तर पक्ष संपेल. म्हणून, आपण या लोकांसाठी काम केलं पाहिजे. भाजप हा सार्वकालिक पक्ष नाहीय. मोदींनंतर भाजप टिकणं फार अवघड आहे, असंही ते म्हणाले.















