शिमला (वृत्तसंस्था) हिमाचल प्रदेशच्या पोटनिवडुकांमध्ये काँग्रेसनं भाजपला धोबीपछाड दिल्याचं चित्र आहे. हिमाचल प्रदेशच्या लक्षवेधी अशा मंडी लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. यापूर्वी या ठिकाणी भाजपचे उमेदवार निवडून आले होते. मात्र या पोटनिवडणुकीत काँग्रेसनं ही जागा भाजपकडून खेचून घेतली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंडी लोकसभेच्या जागेवर कॉंग्रेसच्या प्रतिभा सिंह यांनी भाजप उमेदवाराचा पराभव केला. काँग्रेस उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या पत्नी प्रतिभा सिंह यांनी मंडी लोकसभा मतदारसंघातून ८७६६ मतांच्या फरकाने निवडणूक जिंकली आहे. त्यांना ३६५६५० मते मिळाले, तर भाजपचे उमेदवार कुशल सिंह ठाकूर यांना ३५६८८४ मते मिळाली. पोटनिवडणुकीत एकूण ७४२७७१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यापैकी १२६२६ जणांनी NOTA चे बटण दाबले आहे.
जुब्बल-कोटखाई विधानसभा मतदारसंघ
रोहित ठाकूर (काँग्रेस) यांना २९४४७ मते, चेतन ब्रगटा (अपक्ष) यांना २३३४४ आणि नीलम सराईक (भाजप) यांना जुब्बल-कोटखई जागेवरून केवळ २५८४ मते मिळाली. भाजप उमेदवाराला आपले डिपोझिटही वाचवता आले नाही.
फतेहपूर विधानसभा मतदारसंघ
फतेहपूर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार भवानी सिंह पठानिया यांनी ५७८९ मतांनी विजय मिळवला आहे. मतमोजणीच्या २४ टप्प्यांत भाजपचे उमेदवार बलदेव ठाकूर यांना १८,६६०, भवानी सिंह पठानिया यांना २४४४९ आणि जनक्रांती पक्षाचे पंकज दर्शी यांना ३७५, अशोक सोमल (अपक्ष) २९५ तसेच अपक्ष उमेदवार डॉ. राजन सुशांत यांना १२९२७ मते मिळाली. येथे तिरंगी लढत झाली असली तरी काँग्रेसने येथून विजयाची हॅट्रिक केली आहे.
अर्की विधानसभा मतदारसंघ
अर्की विधानसभा जागा पुन्हा एकदा काँग्रेसच्या गोटात गेली आहे. याआधी वीरभद्र सिंह आमदार होते, मात्र त्यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली. आता येथून संजय अवस्थी विजयी झाले आहेत.