धरणगाव (प्रतिनिधी) येथील नूतन विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणूकीत ‘माविआ’ विरुद्ध भाजपा असा सामना रंगला आहे. या लढतीकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले असून या निवडणुकीकडे नगरपालिकेची रंगीत तालीम म्हणून बघितले जात आहे.
येथील नूतन विविध कार्यकारी सेवा सोसायटीत एकूण १३ जागा असून त्यात ८ सर्वसाधारण, २ महिला, १ एससी, १ एनटी आणि १ ओबीसीची जागा आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे सहकार पॅनल असून त्यांच्याविरुद्ध भाजपाचे शेतकरी पॅनलने चुरस निर्माण केली आहे. तर या निवडणुकीच्या रिंगणात काही अपक्ष देखील आपले नशीब आजमावत आहेत. ‘माविआ’ पुरस्कृत सहकार पॅनलचे चिन्ह छत्री आहे. तर भाजप पुरस्कृत शेतकरी पॅनलचे चिन्ह कपबशी आहे. सहकार पॅनलकडून लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांच्यासारखे दिग्गज हे उमेदवारीच्या रिंगणात आहेत.
‘माविआ’च्या सहकार पॅनलचे नेतृत्व शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष सुरेशनाना चौधरी, सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, कॉंग्रेसचे डी.जी. पाटील, राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांच्यासह ‘माविआ’चे इतर स्थानिक नेते करीत आहेत. तर दुसरीकडे शेतकरी पॅनलचे नेतृत्व शिरीष बयस आणि अॅड. संजय महाजन, कैलास माळी सर, आधार चौधरी, सुदाम मराठे, प्रल्हाद पाटील, डीगंबर चौधरी,हिलाल मराठे, शांताराम बडगुजर, एकनाथ पाटील, नाना शिंदे, सखाराम महाजन, सुधाकर धनगर, योगेश चव्हाण हे करीत आहेत.
नूतन विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीकडे धरणगाव पालिकेची रंगीत तालीम म्हणून देखील बघितले जात आहे. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट आहेत. या निवडणुकीत मोठी आर्थिक उलाढाल होणार असल्याची देखील चर्चा आहे. नूतन विविध कार्यकारी सोसायटीसाठी १९ जून रोजी मतदान होणार असून त्याचदिवशी दुपारी ५ वाजेनंतर मतमोजणीला सुरुवात होणार आहे.