मुंबई (वृत्तसंस्था) देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्ड कनेक्शनचे आरोप केले असताना मलिक यांनी देखील फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या पार्श्वभूमीवर आता नवाब मलिक यांच्याविरोधात भाजपा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मलिक यांचा निषेध करण्यासाठी आज मंत्रालयाबाहेर आंदोलन केलं. तसेच, नवाब मलिक यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं यावेळी दहन देखील करण्यात आलं.
भारतीय जनता युवा मोर्चाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज अचानक मंत्रालयावर धडक दिली. त्यामुळे पोलिसांची एकच तारांबळ उडाली. नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असून त्याचा निषेध करण्यासाठी ही निदर्शने करण्यात येत असल्याचं आंदोलकांनी सांगितलं. भाजयुमोचे नेते विक्रांत पाटील यांच्या नेतृत्वात ही आंदोलने करण्यात आली. यावेळी नवाब मलिक हाय हायच्या घोषणा देत भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला.
यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणा देतानाच नवाब मलिक यांचा पुतळाही जाळला. त्यावेळी आंदोलक अधिकच आक्रमक झाले होते. पोलिसांनीच घटनास्थळी धाव घेऊन या आंदोलकांना पांगवले. त्यामुळे आणखीनच गोंधळ उडाला. त्यामुळे पोलिसांनी विक्रांत पाटील यांच्यासह आंदोलकांना पोलसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर आंदोलन अधिकच चिघळलं. आंदोलकांनीही स्वत: अटक करून घेतल्याने पोलिसांचीही तारांबळ उडाली होती.