वाशिम (वृत्तसंस्था) यवतमाळ वाशिमच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या पाच शिक्षण संस्थांवर ईडीने छापेमारी सुरु केली आहे. या कारवाईनंतर खासदार भावन गवळी यांनी भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. यावेळी त्यांनी ईडीची कोणतीही नोटीस आली नसल्याचं सांगितलं. भाजप शिवसेनेला टार्गेट करत आहे. ईडीची नोटीस न येताच ईडीच्या चौकश्या सुरू झाल्या आहेत, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
केंद्र सरकाची प्रतिनिधी म्हणून माझ्यावर ईडी होत असेल तर अनेकांच्या संस्था आणि कारखाने आहेत. त्यांची चौकशी का होत नाही? केवळ शिवसेनेच्या लोकांनाच का टार्गेट केलं जात आहे? अनिल परब यांना टार्गेट करायचं, सरनाईकांना टार्गेट करायचं सध्या राज्यात सुरू आहे, असा आरोप गवळी यांनी केला. मला कोणतीही नोटीस आलेली नाही. मला नोटीस मिळालेले नाही. त्यामुळेच हा सर्व प्रकार जुल्मी आहे. एक महिला सातत्याने निवडून येत असल्याने तिला डॅमेज करण्याचा हा प्रकार आहे, असा हल्ला त्यांनी चढवला. भावना गवळी सातत्याने पाच वेळा निवडून येते आणि ग्रामीण भागातील लोकांना शिक्षण देण्याचं काम करते. मी कुणाची जमीन घेतली नाही. सरकारचा पैसा वापरला नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
किरीट सोमय्या वगैरे लोकांनी माझ्यावर आरोप केले होते. तेव्हा संस्थेतला हिशोब मला मिळाला नसल्याचा एफआयआर दिल्याचं मी सांगितलं होतं. त्यामुळे त्या एफआयआरमधील केवळ ७ कोटी ट्विट करायचे किंवा १८ कोटी कुठून आले या सर्व गोष्टी करायच्या. माझ्यावर आरोप करायचे आणि माझ्यावर ईडी लावायचे हे सत्र सुरू आहे. जुल्मी सत्रं सुरू आहे. आणीबाणी सारखं हे सत्रं आहे. काय चौकशी करायची ती जरुर करा, पण भावना गवळीची चौकशी करत असताना भाजपचे आमदार आहेत, त्यांच्यावर ५०० कोटी रुपयांचा आरोप आहे. त्यांचे कागदपत्रं ईडी ऑफिसमध्ये आले आहेत. माझी चौकशी करत असाल तर त्यांचीही चौकशी करा. ही माझी केंद्र सरकारला विनंती आहे, असं त्या म्हणाल्या.
कोण आहेत भावना गवळी?
भावना गवळी यांनी वयाच्या २४ व्या वर्षी लोकसभेत प्रवेश केला होता. यानंतर २००४, २००९, २०१४ आमि २०१९ असा सलग पाचवेळा त्यांनी लोकसभेत विजय मिळवला. माजी खासदार स्व. पुंडलिकराव गवळी यांच्याकडून भावना गवळी यांना राजकारणाचे बाळकडू मिळाले. पुंडलिक गवळी यांच्या त्या सर्वात लहान कन्या आहेत. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनी लहान वयातच राजकारणात प्रवेश केला. या कालावधीत त्यांनी यवतमाळ वाशिम मतदारसंघातील अनेक समस्या सोडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे लोकांनी त्यांना भरभरून मतं दिली.