नवी दिल्ली (वृत्तसंस्था) महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सध्या महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडलं आहे. ज्या राज्यात भाजपची सरकारे नाहीत, तिथे भाजप राज्यपालांच्या माध्यमातून सत्ता राबवण्याचा प्रयत्न करत आहे, असा घणाघाती आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
ज्या राज्यात भाजपची सरकारे नाहीत तिथे भाजप राज्यपालांच्या माध्यमातून राज्य करू इच्छिते. दिल्लीत सध्या काय चाललं? दिल्लीचे राज्यपाल त्याच पद्धतीने काम करत आहेत. पश्चिम बंगालचे राज्यपालही त्याच पद्धतीने काम करत आहेत आणि महाराष्ट्राचे राज्यपालही त्याच पद्धतीने दुडूदुडू धावताहेत. धावू द्या. काही हरकत नाहीत. दम लागून पडाल तुम्ही, असा टोला राऊत यांनी राज्यपालांना लगावला आहे.
राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारला पेगासस मुद्द्यावरून धारेवर धरले. आम्हाला खात्री आहे. आम्हा विरोधी पक्षाला जे म्हणायचे आहे. तिच भूमिका सर्व प्रमुख पत्रकार कोर्टात मांडतील. पेगाससवर चर्चा व्हावी अशी आमची साधी मागणी आहे. या देशात जे काही हेरगिरीचं कांड झालंय ते जाणून घ्यायचा देशाला अधिकार नाही का? सरकार अधिकार नाकारत असेल तर या देशातील लोकशाही आम्ही मोडीत काढली आहे. या देशात लोकशाही, संसदीय लोकशाही, संसद या संस्था आम्ही शिल्लक ठेवल्या नाहीत हे त्यांनी सांगावं, असा हल्ला त्यांनी चढवला.
तुम्ही पेगाससवर बोलत नाही, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलत नाही, महागाईवर बोलायला तयार नाहीत, मग तुम्ही कोणत्या विषयावर बोलणार आहात? तुमची अपेक्षा काय आहे? विरोधी पक्षाने सत्ताधाऱ्यांची फक्त चमचेगिरी करावी का? हे चालणार नाही, असा इशारा देतानाच विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांनी हातात हात घालून देशाचं काम करावं ही आमची भूमिका आहे. अनेक प्रश्नांवर एकत्र येणं गरजेचं आहे. विशेषता राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर. पेगासस हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे. त्यावर बोलणार नाही हे किती काळ चालणार. त्यामुळे कोर्टात न्याय मागण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही, असं ते म्हणाले.