नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ओडिशा विधानसभेत शुक्रवारी धक्कदायक घटना घडली. धान्य उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी सरकारच्या भूमिकेचा निषेध करत एका भाजप आमदाराने सभागृहातच सॅनिटायझर पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यामुळे विधानसभेत एकच गोंधळ उडाला.
धान्य उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केल्याच्या विरोधी पक्षाच्या आरोपाला ओडिशा विधानसभेत शुक्रवारी गंभीर वळण आले. या प्रश्नावर सरकारच्या भूमिकेचा निषेध करत ओडिशा विधानसभेत भाजप आमदार सुभाष चंद्र पाणिग्रही यांनी सॅनिटायझर पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ओडिशाचे अन्न आणि खाद्य पुरवठा मंत्री आर.पी. स्वॅन हे धान उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारतर्फे निवेदन वाचत असताना त्यांनी हा टोकाचा प्रयत्न केला. यानंतर पाणिग्रही यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले असून त्यांची प्रकृती आता ठीक आहे.
ओडिशातील धान उत्पादक शेतकऱ्यांचा मुद्दा भाजपा आणि काँग्रेस या विरोधी पक्षांनी विधानसभेत लावून धरला आहे. त्यांच्या आक्रमक पावित्र्यामुळे विधानसभेचे कामकाज दोनदा तहकूब करावे लागले. संध्याकाळी चार वाजता विधानसभेचे कामकाज पुन्हा सुरु झाले. त्यावेळी अन्न मंत्र्यांनी निवेदन वाचण्यासाठी सुरुवात केली. त्यावेळी पाणिग्रह त्यांच्या जागेवर उभे राहिले. त्यांनी सॅनिटायझरची बाटली खिशातून काढली आणि पिण्याचा प्रयत्न केला.
भाजपा आमदार कुसूम टेटे यांनी सुरुवातीला त्यांना अडवलं देखील, त्यानंतर विधीमंडळ कामकाज मंत्री बीके अरुख आणि प्रमिला मलिक यांनी देखील त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पाणिग्रही यांच्या हातामधून सॅनिटायझरची बाटली हिसकावून घेतली.