लखनऊ (वृत्तसंस्था) लखनऊच्या मोहनलालगंज मतदारसंघातून भाजपचे खासदार असणाऱ्या कौशल किशोर यांच्या सुनेनं आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. खासदारांची सून अंकिता यांनी आपल्या हाताची नस कापून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ अंकिताला रुग्णालयात दाखल केलं.
कौशल किशोर हे मोहनलालगंज मतदारसंघाचे खासदार आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या घरात कौटुंबिक वाद सुरु आहेत. याच वादातून त्यांची सून अंकिता हिने टोकाचे पाऊल उचलले. तिने कौशल किशोर यांच्या घराबाहेर येऊन स्वत:च्या हाताची नस कापली. यानंतर अंकिताला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत. अंकिताने आपल्या पतीवर म्हणजे कौशल किशोर यांचा मुलगा आयुष याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सध्या पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत.
अंकिता छठामिल परिसरात राहातात. मात्र, तीन दिवसांपूर्वी त्या आपल्या नातेवाईकांसोबत इथून गेल्या होत्या. व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलीस अंकिताच्या घरी गेले होते. मात्र, घराला कुलूप लावलं होतं. पोलीस त्यांच्या लोकेशनबद्दल तपास करत होते. अंकितानं म्हटलं, की खासदाराच्या कुटुंबानं स्वतःच्या प्रभावामुळं मला या स्थितीमध्ये आणलं आहे. आता माझ्याकडे काहीही पर्याय नाही. मी प्रत्येक ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला, पोलिसांकडे गेले, अधिकाऱ्यांकडेही गेले मात्र कोणीही माझं म्हणणं ऐकलं नाही.
‘मला सांगा, माझं काय चुकलं?’
अंकिता हिने सुसाईड नोटमध्ये कौशल किशोर यांच्या मुलावर आरोप केले आहेत. मी कोणाशी लढू शकत नाही कारण, माझे वडील खासदार नाहीत आणि आई आमदार नाही. माझं कोणीही ऐकून घेणार नाही. मी आजपर्यंत कोणालाही तुला हात लावू दिला नाही. तर मी तुला कशी मारु शकते? तू किती खोटं बोलत आहेस. तू आणि तुझ्या घरच्यांनी मला मरण्याशिवाय पर्याय शिल्लक ठेवलेला नाही, असे अंकिताने आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.
घराचं भाडं भरलं नाही, गॅस लावला नाही, तू एकदाही विचार केला नाहीस मी काय खाणार? तू माझ्याकडे येणार नसशील तर मलाही तुझ्यासोबत राहायचे नाही. मी जातेय. मी तुझ्या लक्षात राहिलेच तर तुला समजेल की तुझ्यावर माझ्यापेक्षा जास्त प्रेम कोणीच केले नाही. माझ्या मृत्यूचे कारण तू आणि तुझ्या घरातील लोक आहेत, असेही अंकिताने म्हटले आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली मागणी
अंकितानं पुढे सांगितलं, की त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही सर्व सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणी काहीच ऐकायला तयार नाही. न्यायालयाकडूनही मला आशा नाही. मी आयुषसोबत बोलण्यासाठी खासदाराच्या घरी गेले होते. त्याआधी मी एक व्हिडीओ प्रसिद्ध केला होता. आयुषच्या घराबाहेर मी उभा होते, मात्र मला कोणीही त्याच्यासोबत बोलू दिलं नाही. मी आयुषची पत्नी आहे. माझी चूक काय आहे, हे मला जाणून घ्यायचं आहे.