नांदेड (वृत्तसंस्था) जिल्ह्यातील देगलूर बिलोली विधानसभेची पोटनिवडणूक ऑक्टोबरमध्ये होणार असल्याचे जाहीर झाले आहे. अशातच आता देगलूरमधील शिवसेनेचे नाराज नेते माजी आमदार सुभाष साबणे हे भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे नांदेडमध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. भाजपनं देगलूर बिलोली जागेसाठी सुभाष साबणे यांना उमेदवारी देखील जाहीर केली आहे.
काँग्रेसने देवलूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या मुलालाच संधी दिलीय. जगदीश अंतापूरकर हे काँग्रेसचे उमेदवार आहेत. आता त्यांना भाजपच्यावतीने शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे निवडणूक रिंगणात असतील. त्यामुळे देवलूर विधानसभा पोटनिवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष लागलंय.
सुभाष साबणे म्हणाले, “मी आजही शिवसैनिक आहे. ४ ऑक्टोबरनंतर जो काही निर्णय आहे तो होईल. माझ्या शिवसैनिकाचा अपमान झाला. पोलिसांनी बुटासह तुडवलं. अशोक चव्हाण यांनी बॅनरवर माझ्या नेत्याचा कधीच फोटो छापला नव्हता. बॅनरवर महाविकासआघाडीच्या नेत्याचे फोटो राहावेत. माझ्या मतदारसंघात येताना महाविकासआघाडीचे नेते म्हणून आघाडीतील घटक पक्षाला सोबत घेऊन आलं पाहिजे. तुम्ही पक्षाचा कार्यक्रम राबवायला नको हीच आमची भूमिका होती. त्यामुळेच आम्ही काळे झेंडे दाखवत होतो. तर पोलिसांनी पकडून बुटासह कार्यकर्त्यांना मारलं.”
देशाच्या पंतप्रधानाला देखील काळे झेंडे दाखवले जातात. बिलोली तालुक्यातील हा प्रकार घडला. मला वाईट वाटलं. म्हणून मी हा निर्णय घेतला. १९८४ पासून मी शिवसैनिक आहे. ज्या दिवशी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अटक होणार होती त्या दिवशी आम्ही विधानसभेत मोडतोड केली होती. त्यामुळे १ वर्षासाठी आम्ही निलंबित झालो. ते दिवसही आम्ही पाहिले,” असं मत सुभाष साबणे यांनी व्यक्त केल.