कोलकाता (वृत्तसंस्था) पश्चिम बंगाल भाजपाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली. यात १३ नावे आहेत. परंतु, मिथुन चक्रवर्ती यांचे नाव नाही. रासबिहारी विधानसभा मतदारसंघातून मिथुनदा यांना तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती.
आगामी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने अंतिम उमेदवार यादी जाहीर केली. मात्र नुकतेच भाजपचा झेंडा हाती धरलेले दिग्गज अभिनेते आणि माजी खासदार मिथुन चक्रवर्ती यांना यादीत स्थान मिळालेलं नाही. मिथुन चक्रवर्ती यांना रासबिहारी मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाईल, असं सांगण्यात येत होतं. पण तिथून भाजपने निवृत्त लेफ्टनंट जनरल सुब्रता साहा यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे. कोलकाता ७ मार्चला पंतप्रधान मोदींच्या भव्य प्रचारसभेवेळी मिथुन चक्रवर्ती यांनी व्यासपीठावर उपस्थित लावली होती. मोदींच्या येण्यापूर्वी मिथुन यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी मिथुन चक्रवर्ती हे रासबिहारीमधून निवडणूक लढवतील असं सांगण्यात येत होतं.
मी इथे मारेन आणि तुमचा मृतदेह थेट स्मशान भूमित दिसेल, असा डायलॉग मिथुन हे बंगाली भाषेत म्हणाले होते. तसंच मी कमी नुकसान करणारा पाणी किंवा मातीला साप नाही, मी कोब्रा आहे. एका दंशात तुम्ही फक्त फोटोतच दिसून येणार, असंही मिथुन बोलले होते.
अलिकडेच कोलकाताच्या मतदारांच्या यादीत त्यांचं नाव नोंदवण्यात आलं. त्यांनी आपलं मतदार कार्ड मुंबईहून कोलकात्यात ट्रान्स्फर केलं. पण आता त्यांच्या निवडणूक लढण्याच्या अपेक्षा धुळीस मिळाल्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये ८ टप्प्यात मतदार होणार आहे. आणि अंतिम टप्प्यातील निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही एप्रिलमध्यपर्यंत आहे. मिथुन चक्रवर्ती हे ३० मार्चला सुवेंदू अधिकारी यांच्यासाठी नंदीग्राममध्ये प्रचारसभा घेतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे यावेळी रोड शोमध्ये उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
भाजपचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण?
पश्चिम बंगालमध्य मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारासाठी भाजपकडे नेत्यांची वानवा नाही. मात्र, हा चेहरा बंगाली अस्मितेला साद घालणारा आणि जनतेला आपलासा वाटणारा हवा, असा भाजपचा प्रयत्न आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराबाबत बराच खल सुरु आहे. सौरव गांगुलीने ही ऑफर नाकारल्यास तृणमूल काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या बड्या नेत्यांपैकी एकाला मुख्यमंत्रीपादाचा दावेदार म्हणून रिंगणात उतरवले जाऊ शकते.