लखनऊ (वृत्तसंस्था) सध्या उत्तर प्रदेश सरकारमधील भाजप मंत्री उपेंद्र तिवारी यांचे एक वक्तव्य चांगलेच चर्चेत आहे. यावेळी, उपेंद्र तिवारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट ‘परमात्म्या’ची उपमा दिल्यानं ते चर्चेत आहेत. ‘नरेंद्र मोदी कोणी साधारण व्यक्ती नाही, तर देवाचा अवतार आहेत’, असं ते म्हणाले आहेत.
“नरेंद्र मोदींचा अभिमान बाळगा ते नवयुगाचे निर्माते आहेत. असा महापुरुष या धरतीवर एकदाच येतो. नरेंद्र मोदी कोणी साधारण व्यक्ती नाही, तर देवाचा अवतार आहेत. एका प्रधानसेवकाच्या रुपात आपल्यामध्ये काम करण्यासाठी ते आले आहेत,” असं उपेंद्र तिवारी यांनी म्हटलं आहे. नुकतंच उत्तर प्रदेशातील ‘या’ भाजपा नेत्याने वाढत्या इंधनदारावर बोलताना देशातील ९५ टक्के लोकांना पेट्रोलची गरज नाही असं आश्चर्यकारक विधान केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरुन जोरदार टीकादेखील करण्यात आली होती. “भारतामध्ये चारचाकी गाड्या चालवणाऱ्या मोजक्या लोकांना पेट्रोलची गरज असते. ९५ टक्के भारतीयांना पेट्रोलची गरज नाही,” असं वक्तव्यही उपेंद्र तिवारी यांनी केलं.