बोदवड (प्रतिनिधी) बोदवड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीसाठी १८ जागांसाठी आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी १८६ अर्ज दाखल झाले आहेत. दरम्यान, गटविकासअधिकाऱ्यांचा भोंगळ कारभार आणि राजकीय नेते व कार्यकर्त्यांची बेफिकिरीमुळे ग्रा.पं मतदारसंघातील मतदार यादीत अनेकांची नावं मतदार यादीत, नसल्याचा आरोप होते आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यावर गोंधळ आला लक्षात !
या निवडणुकीसाठी ग्रामपंचायत मतदारसंघाची मतदारयादी करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्यांची यादी भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर, पं स.च्या गटविकासाधिकाऱ्यांकडून मागवण्यात आल्या. त्यात काही ग्रामपंचायत सदस्यांची नावे नाहीत. ही नावे देतांना त्यांच्या कार्यालयांचा निष्काळजीमुळे प्रारूप मतदारयाद्या प्रसिद्ध झाल्याचा आरोप होत आहे. त्यावेळी कोणत्याही राजकीयपक्षांच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी याचे अवलोकन करून यात नावे नाहीत याची खातरजमा केली नाही. त्यामुळे तीच यादी अंतिम ग्राहय धरली गेली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यावर हा गोंधळ लक्षात आला.
अनेक ग्रामपंचायत सदस्य मतदान करण्यापासून वंचित राहण्याची भीती !
यावर निवडणूक निर्णय अधिकारी कोणताही निर्णय घेऊ शकणार नाही. त्यामुळे आता हे मतदारयादीत नाव नसलेले ग्रामपंचायत सदस्य निवडणुकीत मतदान करण्यापासून वंचित राहतील किंवा त्यांना न्यायालयात दाद मागून आपले नाव समाविष्ट करण्याचा प्रयत्न करावा लागेल. या गोंधळावर राजकीय नेते काय पाऊल उचलतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. उमेदवारी अर्ज दाखल करतांना काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना उद्धव ठाकरे गट, भाजप, शिवसेना शिंदे गट तसेच इतर पक्षाचे उमेदवारांनी आज स्वतंत्र अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे माघारी वेळी युती, आघाडी काशी राहील हे स्पष्ट होईल.
आज दाखल झालेले उमेदवारी अर्ज पुढील प्रमाणे !
व्यापारी मतदार संघ ११ , हमाल मापाडी मतदार संघासाठी १०, महीला राखीव साठी १० , ग्रामपंचायत सर्वसाधारण ३८, सहकारी संस्था मतदार संघातून ७२ , इतर मागास प्रवर्ग मधून ९ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले तर आर्थिक दुर्बल घटक मधून १० , विमुक्त जाती भटक्या जमाती १२ ,अनुसूचित जाति जमाती १४, उमेदवारी अर्ज प्राप्त झाले असे एकूण १८६ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत. आज शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती भाजपा, शिवसेना, आय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याची लगबग आज अकरा वाजेपासून बाजार समिती आवारात दिसत होती.
३० एप्रिल रोजी मतदान आणि निकाल !
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एम आर शहा, सहाय्यक एम बी गाढे व बाजार समिती सचिव विशाल चौधरी व मदतनीस ईसहार शेख, तुषार चिचोले, योगेश सुर्यवंशी यांनी काम पाहिले. यानंतर छाननी ५ एप्रिल व ६ एप्रील रोजी वैध अर्ज जाहीर करणे तर माघार दि ६ ते २० एप्रिलपर्यंत राहील. यानंतर २१ एप्रिल रोजी चिन्ह वाटप होऊन ३० एप्रिल रोजी मतदान होणार असून निकाल सुध्दा याच दिवशी लागणार आहे.