बोदवड (प्रतिनिधी) आठवडे बाजार वसुली घोटाळा आज मुख्याधिकारी गजानन तायडे यांनी पकडला. यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी दोषी कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई असल्याचे स्पष्ट केल्यानंतर पालिकेच्या वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं बाजारात !
येथील आठवडे बाजार वसुलीसाठी दरवर्षी ठेका दिला जातो. मागील ठेकेदाराची मुदत संपलेली असल्याने सध्या ही वसुली नगरपंचायत कर्मचारी करत असतात. मात्र, ही वसुली पावती न देता सुरु असल्याची तक्रार मुख्याधिकारी गजानन तायडे यांना काही नागरिकांनी केली होती. त्याची शहानिशा करण्यास आज बुधवार रोजी दुपारी दोनच्या सुमारास अचानक भेट देऊन चौकशी केली की, कर्मचाऱ्यांनी वसुली करतांना पावती दिली की नाही?. यावेळी कर्मचाऱ्यांनी कोणासही पावती दिली नसल्याचे लक्षात आले. मुख्याधिकारी तायडे यांनी भाजीपाला व इतर विक्रेते यांच्याकडून एक फॉर्म भरून घेतला. या फॉर्ममध्ये नमूद होते की, त्यांच्याकडून पैसे घेतले गेले. परंतु पावती मिळाली नाही. या सर्व प्रकाराची पूर्ण चौकशी करून दोषी कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाई केली जाईल असे मुख्याधिकारी तायडे यांनी सांगितले.
बोदवड आठवडे बाजार वसुली मागील वर्षी असे होते दर !
ऊस बैलगाडी -१०० ,लोटगाडी -३०,भाजीपाला एक काटा दुकान-३०,तसेच एक पाल ३० जर दुकान मोठे असेल तर ६०,९० असे दर आहेत. सर्वसाधारणपणे कमीत कमी १८ हजारपर्यंत बाजार वसुली येत असावी असा अंदाज आहे. गर्दी जास्त असल्यास रक्कम जास्तही होऊ शकते. सोबतच बुधवार सोडून रोजच्या फेरीवाले, भाजीवाले यांच्याकडून सुद्धा वसुली होते व पावत्या दिल्या जात नाही, अशी सुद्धा चर्चा यावेळी होती. आजच्या या कारवाईमुळे बाजारात चांगलीच खळबळ उडाली. पदभार घेतल्यावर आठवडाभरानंतर मुख्याधिकारी यांनी केलेल्या कारवाईमुळे कर्मचाऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. यापुढे अशीच शिस्त ठेवली तर नगरपंचायत कर्मचाऱ्यांना नियमितपणे व योग्य काम करावे लागेल असे नागरिकांमध्ये चर्चा आहे.