बोदवड (प्रतिनिधी) भुसावळ हरणखेडा बसचे ब्रेक फेल झाल्याने बस रस्त्याचे एका बाजूस ठेवलेल्या डिव्हायडरला धडकावून चालकाचे प्रसंगावधानाने मोठा अपघात टाळला.मात्र या अपघातात एका मोटरसायकलचे नुकसान झाले आहे.
आज सकाळी पावणे अकरा वाजेच्या सुमारास भुसावळ कडून येणारी बस( क्र. एम. एच.२० बी. एल.९४८) ही बस बोदवड बस स्थानकाकडे जात असतांना जुन्या तहसील कार्यल्यासमोरील थांब्यावर काही काही प्रवासी उतरवून पुढे निघाली असता काही मीटर अंतर गेल्यावर ब्रेक मारण्याची गरज पडल्यावर ब्रेक फेल झाल्याचे चालक राजेंद्र बारी यांचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ गिअर बदलत वेग कमी करत रस्त्याचे डाव्या बाजूला असलेल्या सिद्धिविनायक हॉस्पिटल व नंदिनी साडी सेंटर समोर गटाराचे काम सुरू असल्याचे ठेवलेल्या रोड डिव्हायडर वर बस धडकवली. यावेळी तिथे उभी असलेली हिरो होंडा पैशन प्रो (क्र. एम. एच.१९ डी ४२७१) ही मोटारसायकल बसच्या पुढच्या चाकांखाली दबून तिचे नुकसान झाले. बसमधे सुमारे ५३ प्रवासी होते, असे वाहक प्रदीप बऱ्हाटे यांनी सांगितले.
सकाळी वर्दळीच्या वेळी ब्रेक फेल झालेली ही बस जर आणखी काही फूट पुढे आंबेडकर चौक भागातील व्यापारी संकुलाच्या समोरील रस्त्याने पुढे आली असती तर मोठा अपघात होऊन जीवित हानी सुद्धा होऊ शकली असती. चालक बारी यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानने हा मोठा अपघात टळला. या अपघाताबाबत चालक राजेंद्र बारी यांच्या खबरीवरून पोलीस ठाण्यात अपघात नोंद झाली असून पुढील तपास पोलीस नाईक शशिकांत शिंदे हे करीत आहेत.
















